Wed, Apr 24, 2019 12:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › २०२० च्या जनगणनेत पारशी समाज अत्यल्पसंख्याक?

२०२० च्या जनगणनेत पारशी समाज अत्यल्पसंख्याक?

Published On: Apr 08 2018 2:13AM | Last Updated: Apr 08 2018 1:46AMठाणे : अनुपमा गुंडे

दानशूर, प्रामाणिक आणि दुसर्‍यांच्या जाती - धर्माचे स्वतंत्र अबाधित ठेवणारे, शांतताप्रिय अशी ओळख असलेला पारशी समाज महाराष्ट्र आणि देशाच्या अनेक भागांत आपल्या संस्कृतीसह रुजला. देशात पहिल्यापासूनच अल्पसंख्याक असणारा हा समाज 2020 च्या जनगणनेत अत्यल्पसंख्याक म्हणून गणला जाईल, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्‍त होत आहे. 

18 ते 19 लाख लोकसंख्येच्या ठाणे शहरात केवळ 400 पारशी स्त्री-पुरुष वास्तव्यास आहेत. तर 2011 च्या जनगणनेनुसार देशात सध्या 57 हजार 264 (देशाच्या लोकसंख्येच्या 0.007 टक्के) पारशी बांधव आहेत. 2020 च्या जनगणनेत पारशी बांधवांची संख्या  अवघी 23 हजारांच्या घरात असणार आहे, शिक्षणासाठी पारशी तरुण-तरुणी परदेशात जातात, तिथेच स्थिरावतात, तिथल्या नागरिकांशी विवाह करतात, अशा कारणांमुळे पारशी समाजाची लोकसंख्या वेगाने घटत चालली आहे. सांस्कृतिक, आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या पारशी समाजाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी पारशी समाजाचे ठाणा पारसी झोरास्ट्रीयन अंजुमनचे सचिव परसी करानी यांच्याशी औपचारिक गप्पा मारल्या. या गप्पांमधून पारशी समाज उलगडत गेला.

पारशी समाजाची लोकसंख्या एवढी कमी का?

पारशी समाज हा 100 टक्के शिक्षित समाज आहे, या समाजातील मुले - मुली पहिल्यापासूनच उच्चशिक्षित आहेत. स्थिरसावर (सेटल) झाल्याशिवाय लग्न करायचे नाही, असा अलिखित नियम समाजात आहे, त्यामुळे मुला- मुलींचे लग्नाचे वय उलटून जाते. उशीरा लग्न झाल्याने अपत्यप्राप्तीसही उशीर होतो किंवा शारीरिक अडचणींमुळे मुले होत नाहीत. हे पारशी लोकसंख्या कमी असण्याचे महत्वाचे कारण. पण, त्याचबरोबर पारशी समाजातील मुलांने आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय मुलीशी विवाह केला तर त्या मुलीस पारशी धर्म स्वीकारण्याची सक्ती केली जात नाही, असे करानी म्हणाले.

यामागचे कारण स्पष्ट करताना करानी म्हणाले, पारशी समाज अल्पसंख्यांक समजला जातो, समाजात मुली किंवा मुले मिळत नसल्याने लोकसंख्या वाढवण्याच्या हेतूने आंतरधर्मीय विवाह केला तर आमच्या समाजावर त्यामुळे धर्मांतरासाठी विवाह केला, असा आरोप होऊ नये, म्हणून आम्ही त्या सुनेला आमच्या धर्माचे पालन करण्याची कुठलीही सक्ती करत नाही. तिला पारशी अग्यारीतही प्रवेश दिला जात नाही. मात्र त्यांना झालेल्या अपत्याचा नवज्योत (वयाच्या 9 ते 11 वर्ष, उपनयन संस्कार) केल्यानंतर ते अपत्य पारशी म्हणून गणले जाते. त्याचबरोबर पारशी समाजातील मुलीने आंतरधर्मीय विवाह केला तर तिच्या पतीसही आमच्या समाजात स्वीकारले जात नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

जिओ पारशी

पारशी समाजाची घटती लोकसंख्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने 2014 ला जिओ पारशी ही योजना सुरू केली. या योजनेनुसार पारशी समाजात ज्यांना मुलं होत नाही, अशा पती - पत्नी अपत्य होण्याच्या उपचारांसाठी लागणारा 5 लाखांपर्यंतचा खर्च केंद्र सरकार देते. या योजनेचा लाभ देशातील काही बांधव- भगिनींनी घेतल्याने या योजनेंतर्गंत 154 बालक- बालिका जन्मास आले आहेत. त्याचबरोबर ज्या पारशी कुटुंबात 3 मुले जन्माला येतील, त्यातील तिसर्‍या मुलाचा खर्च पारशी पंचायत करेल, अशीही योजना आम्ही हाती घेतली होती, असे करानी यांनी सांगितले. केवळ लोकसंख्येसाठी नाही तर पारशी समाजातील हस्तकला (गारा) लुप्त होवू नये, या कलेला उत्तेजन मिळावे, यासाठीही जिओ पारशी या योजनेत तरतूद करण्यात आल्याचे करानी यांनी सांगितले. 

मूळ पार्शियामधून आलेला पारशी समाज गुजरातमध्ये वास्तव्यास होता. ब्रिटिशांनी वाडिया नामक पारशी बांधवास जहाज बांधणीच्या कामासाठी महाराष्ट्रात आणले, तेव्हापासून महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत पारशी समाज आला. समाजात पहिल्यापासूनच शिक्षणाचे प्रमाण जास्त असल्याने आणि इंग्रजी अवगत असल्याने या समाजाचे ब्रिटिशांशी सूर जुळले. त्यामुळे देशातल्या सर्व बहुतांशी उद्योगाची मुहर्तमेढ पारशी समाजातील बांधवांनी केली, या इतिहास साक्ष आहेच. देशातले कोणतेही 1 हजार उद्योगांची यादी काढली तर, त्याची सुरवात पारशी समाजानेच केल्याच्या नोंदी आमच्या समाजाकडे असल्याचे करानी अभिमानाने सांगतात. त्यामुळेच पारशी प्रथम - कोई पन धंदा मे... अशी म्हण आमच्या समाजात रूढ असल्याचे ते सांगतात.