Mon, Jun 17, 2019 14:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई महापालिकेत २०० कोटींचा पाणीमीटर घोटाळा उघडकीस

मुंबई महापालिकेत २०० कोटींचा पाणीमीटर घोटाळा उघडकीस

Published On: May 08 2018 2:01AM | Last Updated: May 08 2018 1:59AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबई महापालिकेतील नालेसफाई व रस्तेघोटाळ्यानंतर आता पाणीमीटर खरेदीत तब्बल 200 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. याबाबतचा अहवाल पब्लिक अ‍ॅकॉन्ट कमिटीने (पीएसी) डिसेंबर 2017 मध्ये नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सादर केला. या अहवालात 13 अभियंत्यांना जबाबदार धरून, दोषी ठरवण्यात आले आहे. 

मुंबई महापालिकेने 2009 मध्ये पाण्याचे जुने मीटर बदलून वेगवेगळ्या गेजचे 1 लाख 35 हजार अ‍ॅटोमॅटिक रिडिंग मीटर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी शहर विभागातील मीटर पुरवठा करण्यासाठी शहरा विभागासाठी प्रतिभा इंडस्ट्रीज, पश्‍चिम उपनगरासाठी एक्सलिया युनिटी जेव्ही व पूर्व उपनगरासाठी जेव्ही युनिटी एक्सलिया या कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली. यासाठी सुमारे 316 कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले. या तीनही कंपन्यांना मीटर बसवण्यासह त्याचे पाच वर्षांपर्यंतचे मेन्टनन्स करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. या कंपन्यांनी सुमारे 33 हजार 977 मीटरचा पुरवठा केला. या खरेदीपोटी या कंपन्यांना आगावू 267 कोटी रुपये देण्यात आले.

त्यामुळे जुने मिटर काढून नविन मिटर बसवणे अपेक्षित होते पण हे मिटर पालिकेच्या गोडाऊनमध्ये पडून राहिले. सुमारे 52 कोटी रुपयाचा आर्थिक फटका पालिकेला बसला असल्याचे पीएसीच्या अहवालात म्हटले आहे. झोपडपट्टी भागात ग्राहकांचे जुने मिटर काढून नविन मिटर बसवण्यात आले. पण त्या मिटरची काही अवधीतच चोरीसह मिटर खराब झाले. या घोटाळ्यात पालिकेच्या जलअभियंता विभागाचे 13 अभियंता यांच्या  हलगर्जीपणामुळे पालिकेचे करोडो रुपयाचे आर्थिक नुकसान झाल्याचे चौकशीत उघडकीस आले. त्यामुळे दोन उप अभियंतांसह तीन कार्यकारी अभियंता आणि आठ सहाय्यक अभियंत्यांना दोषी ठरवण्यात आले. 

Tags : Mumbai, mumbai news, Mumbai Municipal Corporation,  200 crore water meter scam, exposed ,