Thu, Mar 21, 2019 11:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › २० हजार कोटींचा वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्ग

२० हजार कोटींचा वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्ग

Published On: Jan 12 2018 1:53AM | Last Updated: Jan 12 2018 1:38AM

बुकमार्क करा
ठाणे : खास प्रतिनिधी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गापेक्षाही मोठा असा वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्ग 20 हजार कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येणार असून येत्या 3 महिन्यात भूसंपादन व आवश्यक कामे सुरू होतील, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, पायाभूत सुविधांचा झपाट्याने विकास होत असल्याने मुंबई महानगर क्षेत्र हे आगामी काळात देशातील महत्त्वाचे ग्रोथ इंजिन बनेल, असा विश्‍वास व्यक्त केला.

घोडबंदर रोडवरील वर्सोवा खाडीवर नव्या चौपदरी पुलाचे तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या जिल्ह्यातील इतर 7 रस्तेप्रकल्पांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मीरा रोड येथील एस. के. स्टोन मैदान येथे इलेक्ट्रॉनिक नामफलकाची कळ दाबून झाले, यावेळी ते बोलत होते. नितीन गडकरी पुढे म्हणाले की, दोन वर्षांत 10 हजार सी-प्लेन्स आम्ही आणणार आहोत, सागरी जेट्टी, आणि पोर्ट यांना मंजुर्‍या देण्यात येतील. वसई तसेच विरार भागात लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार असून त्यामुळे जेएनपीटीतील मोठ्या कंटेनर्सच्या वाहतुकीचा त्रास कमी होईल.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रस्तावित वर्सोवा नवा खाडी पूल 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत पूर्ण करण्यासाठी मी जिल्हाधिकारी तसेच पोलीस व संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना तसे निर्देश देत आहे. 22 किमीचा मुंबई ट्रान्सहार्बर लिंक 4 वर्षांत पूर्ण करणार असून हा देशातील सर्वात मोठा सागरी सेतू असेल. सध्याच्या वांद्रे-वरळी सागरी सेतू वर्सोवापर्यंत तसेच पुढे वसई-विरारपर्यंत कसा जाईल आणि याभागातील नागरिकांना देखील दर्जेदार आणि अद्ययावत वाहतूक सुविधा मिळेल याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचा मुंबई तसेच महानगर प्रदेशातील सर्व उपनगरांना फायदा होईल. 2011 पर्यंतच्या रहिवाशांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे देत असून मध्यमवर्गीयांना परवडणारी घरे देत आहोत, असे ते म्हणाले.

सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, आज एकाच दिवशी 3 हजार कोटी रुपयांच्या कामांची पायाभरणी होत आहे. महाराष्ट्रात 22000 किमीचे रस्ते बांधण्यात येत असून त्यासाठी 1 लाख 6 हजार कोटी रुपये केंद्र सरकार  महाराष्ट्राला देत आहे. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता यांचीही  भाषणे झाली. याप्रसंगी  आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण तसेच खासदार चिंतामण वनगा, कपिल पाटील, गोपाळ शेट्टी, रवींद्र फाटक, हितेंद्र ठाकूर, संजय केळकर, क्षितिज ठाकूर यांचीही उपस्थिती होती.