होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीत 20 जणांचा तरुणावर प्राणघातक हल्‍ला

डोंबिवलीत 20 जणांचा तरुणावर प्राणघातक हल्‍ला

Published On: Jul 10 2018 1:03AM | Last Updated: Jul 10 2018 1:03AMकल्याण : वार्ताहर

मित्राचा वाढदिवस साजरा करून निघालेल्या चार तरुणांवर दारू प्यायलेल्या 15 ते 20 जणांच्या टोळक्यांनी धारदार शास्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी पहाटे डोंबिवली पूर्वेकडे स्टेशनबाहेर राजू वडापाव गाडीजवळ घडली. या घटनेने शहरात गुंडांनी पुन्हा डोके वर काढल्याचे दिसून येत असून ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी काही महिन्यांपूर्वी डोंबिवली शहर हे रात्रीही सुरक्षित असल्याचे एका कार्यक्रमात सांगितले होते. या गंभीर घटनेवरून त्यांचा हा दावा फोल ठरल्याचेच दिसत आहे.    

टोळक्याच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गौरव दिलीप दास (22) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून तो दावडी गावात राहतो. त्याचा मित्र जयकिशन कनोजिया (21) याच्या फिर्यादीवरून रामनगर पोलीस ठाण्यात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गौरव आणि त्याचे दोन मित्र हे जयकिशनचा वाढदिवस साजरा करून पहाटेच्या सुमारास भूक लागली म्हणून घराबाहेर पडले. डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेरील परिसरात आले असता येथील राजू वडापाववाल्याकडे 15 ते 20 जणांच्या टोळक्यांनी या चार जणांना अचानक मारण्यास सुरुवात केली. दारू प्यायलेल्या हल्लेखोर टोळ्यांमधील एकाने आपण पोलीस असल्याची बतावणी करत इथेच तुमची गेम करू शकतो, असे सांगत मारण्यास सुरुवात केली.