Thu, Jul 18, 2019 21:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › स्वच्छ शहराला २० कोटींचे बक्षीस

स्वच्छ शहराला २० कोटींचे बक्षीस

Published On: Dec 29 2017 1:46AM | Last Updated: Dec 29 2017 1:23AM

बुकमार्क करा
मुंबई : विशेष प्रतिनिधी 

राज्यात आता स्वच्छ वॉर्ड स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून सर्वेक्षणात अव्वल ठरणार्‍या शहरांना प्रोत्साहनपर मोठ्या रकमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्वच्छ वॉर्डासाठी 50 लाख तर शहराला 20 कोटी रुपयांचे बक्षिस देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. 

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्राचा क्रमांक सुधारण्यासाठी शहरे स्वच्छ राहिली पाहिजेत. राज्यातील जास्तीत जास्त शहरांचा स्पर्धेतील बक्षिसपात्र शहरांत समावेश व्हावा यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन फडणवीस यांनी केला. 

केंद्र सरकारकडून राबविण्यात येणार्‍या शहरांच्या स्वच्छ सर्वेक्षणची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यांनी स्वच्छ वॉर्ड स्पर्धेची  तसेच अमृत शहरे व अमृत योजनेत सहभागी नसलेल्या शहरांसाठी प्रोत्साहनपर बक्षिसांची घोषणा केली. 

येत्या 1 जानेवारी 2018 ते 28 फेब्रुवारी 2018 या कालावधीत स्वच्छ वॉर्ड स्पर्धा होणार आहे. मार्च महिन्यात त्रयस्थ संस्थेमार्फत या स्पर्धेचे परिक्षण करण्यात येणार असून यातील पहिल्या तीन वॉर्डना बक्षिसे देण्यात येणार आहेत. अ व ब वर्ग महानगरपालिकांतील पहिल्या तीन वॉर्डना अनुक्रमे 50 लाख, 30 लाख व 20 लाख तर क व ड वर्ग महानगरपालिकेत वॉर्डना अनुक्रमे 30 लाख, 20 लाख व 15 लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येईल.  अवर्ग नगरपरिषदासाठी अनुक्रमे 30 लाख, 20 लाख व 15 लाख तर ब वर्ग नगरपरिषदांसाठी 20 लाख, 15 लाख, 10 लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे.  क वर्ग नगरपरिषदांसाठी अनुक्रमे 15 लाख, 10 लाख व 5 लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या शहरांनाही प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहेत.