Fri, Jul 19, 2019 05:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › २ कोटींचे विदेशी मद्य जप्त

२ कोटींचे विदेशी मद्य जप्त

Published On: Jan 16 2018 2:13AM | Last Updated: Jan 16 2018 12:56AM

बुकमार्क करा
ठाणे : प्रतिनिधी

दिल्लीतून मुंबईत येणार्‍या विदेशी मद्याच्या बाटल्या आणून कर चुकवीत बाजारात मद्य विक्री करण्यासाठी आणलेला मद्याचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला. हस्तगत करण्यात आलेल्या 1800 मद्याच्या बाटल्यांची किंमत 2 कोटी रुपये असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क अतिरिक्त आयुक्त कोकण विभाग तानाजी साळुंखे आणि अधीक्षक नाना पाटील यांनी दिली.

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे विदेशी बनावट मद्याची विक्री करण्यासाठी खार जिमखाना येथे इसम येणार असल्याची माहिती मिळाली होती. यावेळी पुंजालाल पटेल याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्याच्याकडे विदेशी ब्लॅकलेबल स्कॉचच्या 20 बाटल्या आढळल्या. त्याची विचारपूस केल्यानंतर हे मद्य विक्रीसाठी आणल्याचे पटेल याने पथकाला सांगितले. 

सदर मद्याच्या बाटल्या बिपिन शहा नावाच्या इसमाने दिल्याचे पटेल याने सांगितले. पथकाने पटेल याला शहा यांच्याकडून आणखी मद्य मागितले तेव्हा त्याने विजय सेल्स अंधेरी, एसव्ही रोड येथे येण्यास सांगितले. घटनास्थळी बिपिन शहा हा अ‍ॅक्टिव्हा गाडीवरून मद्याच्या बाटल्या घेऊन आला. पथकाने शहा याला ताब्यात घेऊन माल कोठून आणल्याचे विचारताच शहा याने आमरोड, गाळा नंबर 23 अंधेरी पूर्व येथून आणल्याचे पथकाला सांगितले. या ठिकाणी पथकाला स्कॉचच्या 175 बाटल्या सापडल्या.

मद्य विक्री करण्यासाठी आमरोड येथेे भाड्याने घेतलेल्या गाळ्यात  शहा हा अगरबत्तीच्या व्यवसायासोबत स्कॉचचा व्यवसाय करीत होते. ही विदेशी स्कॉच दिल्लीवरून अशोक नावाचा व्यक्ती शहा यांना पाठवीत असल्याचे उघड झाले आहे. या विदेशी मद्याचा माल रेल्वेने येतो मात्र त्याची कोणतीही नोंद रेल्वेकडे नसल्याचे यात निष्पन्न झाले आहे. 

भरारी पथकाने 175 बॉक्समध्ये 1800 स्कॉचचे महागडे मद्य सापडले. यात विविध ब्रँण्डसोबत व्होडका, वाईन आणि स्कॉच असा 2 कोटींचा साठा सापडला. विदेशी मद्य विकल्याप्रकरणी बिपिन शहावर 3 वर्षांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक आता मुख्य डीलरचा शोध घेत आहेत.