Thu, Jul 18, 2019 04:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडीत हत्येचा कट पोलिसांनी उधळला?

भिवंडीत हत्येचा कट पोलिसांनी उधळला?

Published On: Jun 22 2018 2:42AM | Last Updated: Jun 22 2018 1:32AMभिवंडी : वार्ताहर

भिवंडी शहरातील समदनगर परिसरातील एका बड्या राजकीय नेत्याची हत्या करण्याच्या उद्देशाने आलेल्या 2 शार्पशुटरांचा शहर पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून त्यांना गजाआड केले. ही घटना गुरुवारी पहाटे वाजा मोहल्ला येथील सुपर टॉवर समोर घडली. मोहमद साजिद निसार अन्सारी (30 रा. किडवाईनगर), दानिश मो. फारुख अन्सारी (20, रा. शांतीनगर) अशी आरोपींची नावे आहेत. 

शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद बरकडे, पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील यांचे पथक बुधवारी मध्यरात्री वाजा मोहल्ला परिसरात गस्त घालत असताना सुपर टॉवर समोर दोनजण मोटरसायकल उभी करून संशयास्पद हालचाली करत असल्याचे पोलिसांना दिसले. पथकाने या दोघांना हटकले असता दोघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सुमारे 20 मिनिटे दोघांचा पाठलाग करून नागरिक नुरुद्दीन मोमीन ऊर्फ कल्लन व जाकीर अली खान या दोघांच्या मदतीने त्यांच्या मुसक्या आवळल्या. 

या दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कमरेला खोचलेले 1 लाख 5 हजार रुपये किंमतीचे दोन विदेशी बनावटीचे पिस्तूल सापडले. या पिस्तुलांवर मेड इन यूएसए असे लिहिले आहे. त्यांच्याकडून 15 जिवंत काडतूसे, 2 मोबाईल, एक मोटरसायकल, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुरुवारी दुपारी दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या दोघांचा कोणत्या गँगशी संबंध आहे का? याबाबत अधिक तपास एपीआय जिलानी शेख करीत आहेत.