Thu, Apr 25, 2019 07:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 1993 स्फोट मालिका : 27 आरोपी अजूनही मोकाटच

1993 स्फोट मालिका : 27 आरोपी अजूनही मोकाटच

Published On: Mar 12 2018 1:24AM | Last Updated: Mar 12 2018 1:09AMमुंबई : प्रतिनिधी

संपूर्ण देशाला हादरवणार्‍या मुंबईतील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटाच्या घटनेला सोमवारी 25 वर्ष पूर्ण होत असून या महाभयंकर विध्वंसाच्या कटु आठवणी ताज्या झाल्या आहेत. या गुह्यात अनेकांना शिक्षा झाली असली तरी कटाचा मुख्य सूत्रधार आणि मोस्ट वॉन्टेड कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनीस इब्राहिम यांच्यासह 27 आरोपी अजूनही फरार आहेत.

12 मार्च 1993 साली शहरात घडवून आणलेल्या 12 साखळी बॉम्बस्फोटात 257 नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर 713 जण कायमचे जायबंदी झाले होते. हे बॉम्बस्फोट घडवण्यासाठी तब्बल तीन हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणण्यात आले होते. मात्र त्यापैकी दहा टक्केच आरडीएक्सचा वापर करून देशातील सर्वात मोठा हा महाभयंकर विध्वंस घडवण्यात आला होता.

मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील 129 आरोपींपैकी अभिनेता संजय दत्त याच्यासह सुमारे 100 जणांना टाडा न्यायालयाने दोषी ठरवत, स्फोटातील सहभाग आणि केलेल्या गुन्ह्यानुसार त्यांना 6 महिन्यांपासून ते फाशीपर्यंतची याआधीच सुनावली आहे.  बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार म्हणून याकूब मेमन याला विशेष टाडा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावून त्याला फासावर लटकवण्यात आले आहे. तर बॉम्बस्फोटांच्या कटातील मुख्य आरोपी आणि गुजरातला आलेला शस्त्रसाठा मुंबईत पाठवणार्‍या गँगस्टर अबू सालेम, तसेच स्फोटांसाठी लागणारे आरडीएक्स आणणार्‍या मुस्तफा डोसा याच्यासह फिरोज खान, ताहिर मर्चंट, करीमुल्लाह शेख आणि रियाज सिद्दीकी यांनाही न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपींपैकी एक आणि दाऊदचा खास हस्तक यासीन मन्सूर मोहम्मद फारुख ऊर्फ फारुख टकला याला दुबईतून हस्तांतरित केल्यानंतर सीबीआयने गुरुवारी सकाळी त्याला दिल्ली विमानतळवरून अटक केली आहे. फारुख टकला याने दाऊदसह अनिस इब्राहिम, टायगर मेमनसह अन्य मुख्य आरोपींसोबत बॉम्बस्फोटांचा कट आखण्यापासून स्फोटांसाठी शस्त्रास्त्रे, दारूगोळा उतरवणे, बॉम्ब तयार करणे, शस्त्रांस्त्राच्या प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात नेण्यात येणार्‍यांचे पासपोर्ट बनवून त्यांना भारतातून दुबईमार्गे पाकिस्तानात नेणे, त्यांना पुन्हा भारतात आणणे, रसद पुरवणे, बॉम्बस्फोटासाठी दुबईमध्ये बैठका आयोजित करणे अशा महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. टकलाची अटक ही सीबीआयचे मोठे यश मानले जाते.

स्फोटाचा घटनाक्रम

 •  दुपारी 1.30 वाजता मुंबई शेअर मार्केट इमारतीच्या तळमजल्यावर स्फोट झाला. यात 84 ठार तर 217 जण जखमी झालेत.
 •  दुपारी 2.15 वाजता नरसी नाथा स्ट्रीट, काथा बाजार, 4 ठार, 16 जखमी
 •  दुपारी 2.30 वाजता पेट्रोल पंप, शिवसेना भवन, 4 ठार, 50 जखमी
 •  दुपारी 2.33 वाजता एअर इंडिया इमारत, नरिमन पॉईंट, 20 ठार, 87 जखमी
 •  दुपारी 2.45 वाजता मच्छीमार वसाहत, माहीम. 3 ठार, 6 जखमी
 •  दुपारी 2.25 वाजता सेंच्युरी बाझार, वरळी. 113 ठार, 227 जखमी
 •  दुपारी 3.05 वाजता झवेरी बाझार. 17 ठार, 57 जखमी
 •  दुपारी 3.10 वा. हॉटेल सेना रॉक, बांद्रा
 •  दुपारी 3.13 वाजता प्लाझा सिनेमा, दादर. 10 ठार, 37 जखमी
 •  दुपारी 3.20 वाजता हॉटेल जुहू सेंटर, 3 जखमी
 •  दुपारी 3.30 वाजता सहार विमानतळाजवळ
 •  दुपारी 3.40 वाजता हॉटेल एअरपोर्ट सेंटर, 2 ठार, 8 जखमी.