Wed, Sep 26, 2018 12:11



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे १९ ऑगस्टला सदनिका सोडत

म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे १९ ऑगस्टला सदनिका सोडत

Published On: Jul 17 2018 1:35AM | Last Updated: Jul 17 2018 1:25AM



मुंबई : प्रतिनिधी 

म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे परवडणार्‍या घरांची राज्यात सर्वात मोठी म्हणजेच नऊ हजार अठरा सदनिकांची विक्रमी सोडत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात परवडणार्‍या घरांचाही समावेश करण्यात आला असून या सोडतीसाठी 18 जुलैपासून अर्ज नोंदणीला सुरूवात होणार आहे. म्हाडाकडे सादर होणार्‍या अर्जांची संगणकिय सोडत वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या म्हाडाच्या मुख्यालयात 19 ऑगस्टला सकाळी दहा वाजता काढण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी विजय लहाने यांनी दिली.        

यंदाच्या सोडतीमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी मीरा रोड, बाळकूम ठाणे, शिरढोण (ता. कल्याण), खोणी (ता. कल्याण), मौजे अंतर्ली, खोणी हेदुटने, कोले (ता. कल्याण), मौजे उंबार्ली (ता. अंबरनाथ) येथील एकूण 4 हजार 455 सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. 

यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शिरढोण (ता. कल्याण) येथील 1 हजार 905, खोणी (ता.कल्याण ) येथील 2 हजार 32 इतक्या अत्यल्प गटातील सदनिकांचा समावेश असून या सदनिकांकरिता भारतात कुठेही स्वमालकीचे घर नसलेला परंतु मुंबई मेट्रो रिजनने (एमएमआर) अधिसूचित केलेल्या सर्व क्षेत्रातील नागरिकच अर्ज करू शकतात. या योजनेतील घरांसाठी अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न तीन लाख इतके मर्यादित आहे. तसेच कोकण मंडळाच्या अल्प उत्पन्न गटाकरिता मीरा रोड, कावेसर ठाणे, वेंगुर्ला सिंधुदुर्ग, विरार बोळींज, खोणी (ता. कल्याण), मौजे अंतर्ली, खोणी हेदुटने, कोले (ता. कल्याण), मौजे उंबार्ली (ता. अंबरनाथ) येथील 4 हजार 341 सदनिकांचा समावेश आहे. 

मध्यम उत्पन्न गटाकरिता बाळकूम (ठाणे), वेंगुर्ला (सिंधुदुर्ग), मीरा रोड, कुंवर बाव (रत्नागिरी), विरार बोळींज येथील एकूण 215 सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. तर उच्च उत्पन्न गटाकरिता वेंगुर्ला (सिंधुदुर्ग),  मीरा रोड, कुंवर बाव (रत्नागिरी) येथील एकूण 7 सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.

या सोडतीकरिता माहितीपुस्तिका आणि ऑनलाईन अर्ज म्हाडाच्या htpps://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याच संकेतस्थळावर अर्जदारांची नोंदणी 18 जुलैला दुपारी 2 वाजल्यापासून 8 ऑगस्ट रात्री 11.59 वाजेपर्यंत करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जदारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास 19 जुलैला दुपारी 2 वाजल्यापासून प्रारंभ होणार असून 9 ऑगस्ट रात्री 11.59  वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. 10 ऑगस्ट सायंकाळी सहा वाजेपर्यंत अनामत रक्कम अथवा अर्ज शुल्क ऑनलाईन भरण्याची मुदत देण्यात आली आहे. कोंकण मंडळातर्फे यंदा प्रथमच अर्जदारांना एनईएफटी अथवा आरटीजीएसद्वारे अनामत रक्कम भरण्याचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच डेबिट कार्ड अथवा क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंगद्वारे अनामत रक्कम भरता येणार आहे. सदनिकांच्या वितरणासाठी कोणालाही म्हाडाने प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजन्ट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये. तसे केल्यास कोंकण मंडळ / म्हाडा कोणत्याही व्यवहारास किंवा फसवणुकीस जबाबदार राहणार नाही.

 या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम आणि आणि उच्च उत्पन्न गटाकरिताच्या सदनिकांचा समावेश आहे. अत्यल्प उत्पन्न गटाकरिता सन 2017-2018 या आर्थिक वर्षातील अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न (पती + पत्नी यांचे एकत्रित उत्पन्न) 25 हजार रूपयांपर्यंत असावे. अल्प उत्पन्न गटाकरिता 25 हजार 1 ते 50 हजारपर्यंत आणि मध्यम उत्पन्न गटाकरिता 50 हजार 1 ते 75 हजार रुपयांपर्यंत तर उच्च उत्पन्न गटाकरिता अर्जदाराचे 75 हजार 1 किंवा त्यापेक्षा जास्त सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम (परतावा) + अर्ज शुल्क (विना परतावा) अत्यल्प उत्पन्न गटाकरिता रु. 5 हजार 448/- प्रति अर्ज, अल्प उत्पन्न गटाकरिता 10 हजार 448 प्रति अर्ज, मध्यम उत्पन्न गटाकरिता 15 हजार 448 प्रति अर्ज, उच्च उत्पन्न गटाकरिता 20 हजार 448 रूपये प्रति अर्ज आकारली जाणार आहे. यामध्ये ऑनलाईन अर्जापोटी प्रतिअर्ज 448 रुपये (विना परतावा) अर्ज शुल्काचा समावेश असल्याचे म्हाडाच्यावतीने सांगण्यात आले.