Mon, Jan 21, 2019 23:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रस्ते घोटाळ्यात १८० इंजिनीअर दोषी

रस्ते घोटाळ्यात १८० इंजिनीअर दोषी

Published On: Feb 24 2018 1:36AM | Last Updated: Feb 24 2018 1:18AMमुंबई : प्रतिनिधी 

महापालिकेत मागील दोन वर्षे गाजत असलेल्या रस्ते घोटाळ्याचा अखेर सोक्षमोक्ष लागला. पालिकेने या प्रकरणाच्या 200 रस्त्यांबाबतचा अंतिम अहवाल शुक्रवारी प्रसिद्ध केला. चौकशी झालेल्या 185 पैकी तब्बल 180 इंजिनीअर त्यात दोषी ठरले आहेत. यातील सहा इंजिनीअरना पालिकेच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून पाच इंजिनीअर या चौकशीत निर्दोष सुटले आहेत.

पालिकेच्या रस्ते विभागात मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याची तक्रार तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर यांनी पालिका आयुक्तांकडे केली होती. त्यावर आयुक्तांनी 234 रस्त्यांच्या चौकशीचा निर्णय घेतला. वर्षभरापूर्वी पहिल्या टप्प्यातील 34 रस्त्यांचा अहवाल जाहीर करण्यात आला. त्यात 100 इंजिनीअरची चौकशी होऊन 96 इंजिनीअर दोषी ठरले होते. तर चार इंजिनिअरना निलंबित करण्यात आले. 

त्यानंतर उर्वरित 200 रस्त्यांची चौकशी पालिकेने पूर्ण केली असून त्यामध्ये 185 इंजिनीअरची चौकशी करण्यात आली. त्यापैकी 180 इंजिनीअर दोषी ठरले आहेत. पहिल्या टप्प्यातील 34 रस्त्यांच्या घोटाळ्यातील 100 इंजिनीअरपैकी 84  इंजिनीअर हे 200 रस्त्यांच्या चौकशीतही आढळून आले आहेत. जबाबदारी निश्चित करण्यात आलेला हा अहवाल उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) रमेश बांबळे व प्रमुख चौकशी अधिकारी राजेंद्र रेळेकर यांनी पालिका आयुक्त अजय मेहता यांना सादर केला आहे.