Sun, Mar 24, 2019 23:34
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडीतील १८ नगरसेवकांचे पद धोक्यात!

भिवंडीतील १८ नगरसेवकांचे पद धोक्यात!

Published On: Jan 15 2018 1:39AM | Last Updated: Jan 15 2018 1:08AM

बुकमार्क करा
भिवंडी  : वार्ताहर 

भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेच्या मे 2017 मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांनी राज्य निवडणूक आयोगास सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार विहित कालावधीत आपली कागदपत्रे सादर न केल्याने काँग्रेस, शिवसेना, भाजप, कोणार्क विकास आघाडी आदी पक्षाच्या 18 नगरसेवकांचे पद धोक्यात आले आहे. यातील 9 नगरसेवकांची सुनावणी आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्याकडे सुरू असल्याने त्यांचे नगरसेवकपद केव्हाही जावू शकते, असे सांगण्यात येत आहे. यावर उपाय म्हणून या नगरसेवकांनी आमदार, खासदार व मंत्रिपातळीवर भेटीगाठी सुरू करून आयुक्त डॉ.  म्हसे यांच्यावर आगामी महासभेत अविश्वास ठराव मांडण्यासाठी गोपनीय बैठक घेतल्याचे बोलले जात आहे.

पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 90 नगरसेवक निवडून आले. त्यावेळी राज्य निवडणूक आयोगास उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात काहींनी चुकीची माहिती दिली आहे. तर काहींनी अपुरी कागदपत्रे निवडणूक यंत्रणेकडे सादर करून उरलेली कागदपत्रे निवडणुकीनंतर सहा महिन्यात सादर करण्याची प्रतिज्ञापत्रे त्यांनी लिहून दिली होती. मात्र ती अद्यापही सादर केलेली नाहीत. त्यामुळे  पालिका आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्याकडे निवडून आलेल्या विविध नगरसेवकांच्या विरोधात काही पराभूत उमेदवारांनी व विरोधकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यामध्ये अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणे, अनधिकृत बांधकामांत सहभाग असणे, गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवून ठेवणे, तीन अपत्य असल्याचे लपवून ठेवणे आदी तक्रारींचा यात समावेश आहे. अशा तक्रारींची आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्याकडे सुनावणी सुरू झाली आहे. त्यामुळे सुमारे 18 नगरसेवकांची पदे धोक्यात आली आहेत. 

प्रभाग क्र.7 मधून निवडून आलेल्या साजीदाबानो इश्तियाक मोमीन यांचा 2012 च्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज तीन अपत्य असल्याने फेटाळला होता. मात्र त्यांनी निवडणूक यंत्रणेची दिशाभूल करून 2017 च्या पालिका निवडणुकीत वडीलांचे नाव धारण करून माहेरच्या नावाने उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढवली आणि प्रभाग क्र.7 मधून निवडून आल्या. 

त्यांच्या विरोधात माजी नगरसेवक अनिस मोमीन यांनी मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल करून निवडणूक यंत्रणेला खोटी माहिती दिल्याप्रकरणी साजीदाबानो मोमीन यांच्या निवडीला आव्हान दिले. त्यांची 2012 व 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीची कागदपत्रे व इतर पुरावे सादर केल्यानंतर न्यायालयाने साजीदाबानोचे नगरसेवकपद रद्द करून पुढील कारवाईसाठी पालिका आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्याकडे पाठवले आहे. त्यामुळे आयुक्तांनी याबाबत सुनावणी घेऊन आपला अहवाल तयार केला असून विधी विभागाशी चर्चा करून निर्णय दिला जाईल, असे आयुक्त म्हसे यांनी सांगितले.

निवडणुकीत प्रभाग क्र. 4 मधून मोहम्मद अर्शद मोह. अस्लम अन्सारी हे निवडून आले. त्यांनी उमेदवारी अर्ज सादर करताना निवडणूक विभागाकडे उत्तरप्रदेशमधील जातीचा दाखला सादर केला होता. या जातीच्या दाखल्यास माजी उपमहापौर डॉ. नुरूद्दीन अन्सारी यांनी आव्हान देत कोकण विभागीय जातपडताळणी विभागाकडे नगरसेवक मोह. अर्शद यांच्या विरोधात तक्रारी अर्ज केला होता.