Wed, Jan 16, 2019 20:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 15 हजार गावे यावर्षी दुष्काळमुक्त करणार

15 हजार गावे यावर्षी दुष्काळमुक्त करणार

Published On: Feb 27 2018 1:59AM | Last Updated: Feb 27 2018 1:36AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

राज्याची अर्थव्यवस्था एक हजार अब्ज डॉलर्स बनेल असा ठाम विश्‍वास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आपल्या अभिभाषणातून केला. राज्याच्या कृषी क्षेत्रातील गुंतवणूक  280 टक्क्यांनी वाढून या वर्षी 83 हजार कोटी इतकी झाली आहे. 46. 35 लाख शेतकरी खात्यांमध्ये शेतकरी कर्जमाफी योजनेचे पैसे टाकण्यात आले असून जलयुक्त शिवार योजशनेच्या माध्यमातून मे पर्यंत 15 हजार गावे ही दुष्काळमुक्त होणार असल्याचेही राज्यपाल म्हणाले. 

राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाने विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सोमवारी सुरुवात झाली. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या या अभिभाषणात त्यांनी राज्याच्या चौफेर प्रगतीचा आढावा घेतला.

26 अपूर्ण सिंचन प्रकल्प पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यामुळे 5.56 लाख हेक्टर अतिरिक्‍त सिंचन क्षमता निर्माण होईल. विदर्भ-मराठवाड्यातील 1100 गावांमध्ये एक विशेष दुग्धविकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. दोन वर्षांत 37 हजार विहिरी बांधण्यात आल्या असून 78 हजार विहिरी बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत 62 हजार पेक्षा जास्त शेततळी बांधण्यात आली आहेत, असे राज्यपाल म्हणाले. राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत 6 लाखापर्यंत उत्पन्न मर्यादेत लाभ देण्यात येणार असून यामुळे राज्यातील जवळपास 7 लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. त्यांना 605 अभ्यासक्रमात शिक्षण शुल्कामध्ये सवलत मिळणार आहे. प्रति हजारी बालमृत्यू दर 24 वरून 19 पर्यंत कमी झाल्याचेही राज्यपालांनी सांगितले.