Mon, May 20, 2019 10:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोस्टल रोडसाठी  1500 कोटींची तरतूद

कोस्टल रोडसाठी  1500 कोटींची तरतूद

Published On: Feb 03 2018 2:42AM | Last Updated: Feb 03 2018 2:41AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबईकरांच्या वाहतुकीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणार्‍या नरीमन पॉईंट ते कांदिवली कोस्टल रोडची निविदा प्रकिया पूर्ण झाली असून त्याचे भूमिपूजन एप्रिल 2018 मध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात 1 हजार 500 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. 

कोस्टल रोडला मे 2017 मध्ये सागरी किनारा नियामक क्षेत्राकडून (सीआरझेड) अंतिम मंजुरी मिळाली आहे. त्याशिवाय नौदल, तटरक्षक दल, उच्च न्यायालयीन समिती, वारसा जतन समिती, महसूल व वाहतूक खाते आदींसह 17 मान्यता प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण करून एप्रिलअखेरीस कोस्टल रोडचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्पष्ट केले. 29.2 किमी लांबीच्या या प्रकल्पाचा खर्च 15 हजार कोटी रुपये असून पहिल्या टप्प्यात प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते बांद्रा-वरळी सी लिंकपर्यंत काम पालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे 1 लाख रोजगारनिर्मिती होणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले. 

गोरेगांव-मुलुंड लिंक रोडसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद

पश्‍चिम उपनगर व पूर्व उपनगराला जोडणार्‍या गोरेगाव-मुलुंड लिंक रोडला चालना देण्यासाठी 2018-19 

च्या अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. हा प्रकल्प तीन टप्प्यात राबवला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात नाहूर येथे मध्य रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाच्या रूंदीकरणाचा समावेश आहे. दुसर्‍या टप्प्यात पूर्व उपनगरामध्ये मुलुंड येथे पूर्व द्रुतगती मार्गापासून तानसा पाईपलाईनपर्यंत आणि पश्‍चिम उपनगरामध्ये गोरेगाव पश्‍चिम द्रुतगती महामार्गापासून चित्रनगरी गोरेगाव पर्यंतच्या कामाचा समावेश आहे. या दोन्ही कामांच्या निविदा मागवण्यात आल्या असून याबाबतचा प्रस्ताव लवकरच स्थायी समितीच्या मंजूरीसाठी सादर करण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. तिसर्‍या टप्प्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (नॅशनल पार्क) उद्यानाखालून भूमिगत बोगदा काढण्यात येणार आहे. याला पर्यावरण खात्याची मंजुरी मिळाल्यानंतर कामाला सुरूवात होईल, असेही आयुक्तांनी सांगितले. 

पादचारी पुलांना सरकते जिने

मुंबईतील पादचारी पूल व स्कायवॉकला सरकते जिने (एस्कलेटर्स) बसवण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. यात मरीन ड्राईव्ह येथील पादचारी पुलासह जोगेश्वरी, कुर्ला बुध्द कॉलनी येथील पुलांचा समावेश आहे. दरम्यान गोरगाव येथील मृणालताई गोरे उड्डाणपूल, बोरीवली सुधीर फडके उड्डाणपूल, मुलुंड जकात नाका पूल, मानखुर्द साठेनगर पूल, महापक्ष्मी हाजी अली वरळी नाका आदी पुलांचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान या पुलांसाठी 467 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. 

गावठाणात रस्त्यांचे काँक्रीटीकरण

गावठाणातील रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी पालिकेने येथील रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अर्थसंकल्पात 1 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान रस्ते दुरूस्त करताना ब्लॅक स्पॉटस् काढून टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.