Tue, Jun 02, 2020 03:18
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत आणखी 15 नवे रुग्ण

मुंबईत आणखी 15 नवे रुग्ण

Last Updated: Mar 30 2020 1:23AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबईत गेल्या 24 तासांत 15 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. तर एका महिलेचा मृत्यू झाला. हे सर्व रुग्ण मुंबईतील आहेत. त्यामुळे मुंबईतील संख्या आता 123 वर पोहोचली आहे.राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी सांगितले की, राज्यभरात दाखल झालेल्या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक मुंबईचे असून 5 रुग्ण पुण्याचे, 3 नागपूरचे, 2 अहमदनगरचे, तर सांगली, बुलढाणा आणि जळगाव येथील प्रत्येकी 1 रुग्ण आहे. 

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. गेल्या 24 तासांत 357 संशयित रुग्णांना तपासण्यात आले. त्यापैकी 93 संशयित रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यापैकी 15 जणांचे चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 6 पुरुष, 9 महिला आहेत. त्यामध्ये एका 14 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. तिघांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे. तर उर्वरित रुग्ण निकट संपर्कात आल्याने लागण झाली. या सर्व रुग्णांवर कस्तुरबा, ट्रॉमा केअर, राजावाडी, केईएम, पोर्ट ट्रस्टच्या आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

25 जानेवारीपासून 7928 संशयित रुग्णांना तपासण्यात आले. त्यापैकी 1828 संशयित रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यापैकी 123 जणांचे चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात मुंबईमधील 88 तर मुंबई बाहेरील 35 रुग्ण आहेत.

महिलेचा मृत्यू

रविवारी एका 40 वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला. छातीत दुखू लागल्याने पालिकेच्या केईएम रुग्णालयात तिला शनिवारी दाखल केले होते. श्वास घेण्यास तिला त्रास होऊ लागल्याने तिचा मृत्यू झाला. दरम्यान, कोरोनामुळे तिचा मृत्यु झाल्याचे पालिकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच सदर महिला आणखी कोणाकोणाच्या संपर्कात आली आहे, याबाबत शोध घेण्यात येत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. आतापर्यंत मुंबईमधील 5 तर मुंबईबाहेरील 2 अशा एकूण 7 जणांचा मृत्यू झाला आहे.