Thu, Jul 18, 2019 08:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जेनएपीटीत पुन्हा एकदा सापडले सोन्याचे घबाड

जेनएपीटीत पुन्हा एकदा सापडले सोन्याचे घबाड

Published On: Jan 04 2018 8:32AM | Last Updated: Jan 04 2018 8:32AM

बुकमार्क करा
उरण : जीवन केणी

जेएनपीटी बंदरात सोने तस्करीचे प्रकार सुरुच असून गेल्या पाच दिवसांत दुसर्‍यांदा बुधवारी दुपारी डीआरआयने (महसूल गुप्तचर संचनालय) धाड टाकून 15 किलो सोने जप्‍त केले आहे. परदेशातून एसीच्या फॅनमध्ये लपवून तस्करीच्या उद्देशाने हे सोने आणले होते. ग्लोबिकॉन नामक गोदामात हे सोने लपवून आणले होते. चंदन तस्करीमुळे गाजलेल्या जेएनपीटीला सोन्याच्या तस्करीचाही बट्टा लागल्याचे पुन्हा एकदा झालेल्या या कारवाईने स्पष्ट होत आहे.

सिंगापूर वरून आयात केलेल्या कंटेनरमध्ये यापूर्वी ज्या पद्धतीने सोने लपवून आणल्याचे उघड झाले होते, त्याच पद्धतीने आणखी एका कंटेनरमध्येएसीच्या सामानाच्या कन्साईनमेंटमध्ये सोने आढळून आल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. जीडीएलमधील घटनेला अवघे 5 दिवस उलटत नाहीत तोच पुन्हा ग्लोबिकॉन नामक गोदामात आलेल्या एका कंटेनरमधील एसीच्या कन्साईनमेंटमध्ये पुन्हा एकदा सोने आढळून आल्याची घटना घडली आहे. यापूर्वी उरणच्या जीडीएल गोदामात जनरल या नावाने एसी घेऊन आलेल्या बॉक्समध्ये लपवून सोने आणण्यात आल्याची घटना घडली होती. त्या घटनेशी मिळती जुळती घटना पुन्हा उघडकीस आली. बुधवारी दुपारी येथील कोप्रोलीच्या ग्लोबिकॉन गोदामात त्याच प्रकारच्या कन्साईनमेंटमध्ये पुन्हा एकदा सोने सापडले आहे. ही कारवाई करीत असताना गोदामातील सर्व कामगारांना बाजूला काढण्यात आले होते. मात्र आतील काही कामगारांकडून मिळालेल्या माहिती नुसार रिफर कंटेनरमध्ये असलेल्या खोक्यामध्ये हा माल मिळाला असल्याची माहिती फोटोसह मिळाली आहे.

उरणचे जेएनपीटी बंदर हे सातत्याने कोणत्या ना कोणत्या तस्करीने गाजत असताना मागील अवघ्या 5 दिवसाच्या अंतरात दुसर्‍यांदा सोने मिळण्याची घटना घडूनही डिरेक्टर ऑफ इंटेलिजन्स ब्युरोच्या कोणाही अधिकार्‍याने पुढे होऊन याबाबतची अधिकृत माहिती माध्यमांना दिली नाही. त्याचप्रमाणे न्हावाशेवा कस्टमच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला याबाबत काहीही माहिती नाही टीडी आरआयची कारवाई असेल अशी माहिती दिली . स्थानिक पोलिसांना देखील याबाबत कोणतीही माहिती नसल्याची बाब पोलिसांनी सांगितली. मात्र या कारवाई संदर्भात जे फोटो व्हायरल झाले आहेत त्यामध्ये मात्र पोलीस दिसत आहेत. त्यामुळे हा नक्की काय प्रकार आहे याबाबत तर्क वितर्क लढविले जात आहेत. मन लाँजिस्टीक नावाच्या आयातदाराने हे कन्साईनमेंट मागविल्याची माहिती मिळत असून एसी कॉम्प्रेसरच्या फॅन बेल्टमध्ये लपवून हे सोने आणण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या संदर्भात डीआरआय कार्यालयाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. कंपनीतील कामगारांनी याबाबत फोटो काढले होते. त्या कामगारांचे मोबाईल ही जप्त करण्यात आले अशी माहिती मिळाली.