Sat, Jul 04, 2020 15:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत कोरोनाचे १४४२ नवे रुग्ण

मुंबईत कोरोनाचे १४४२ नवे रुग्ण

Last Updated: Jun 05 2020 1:18AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाचे राज्यभर सुरू असलेले वादळ शांत होण्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. रोज विक्रमी संख्येने मुंबईत आणि राज्यात रुग्ण वाढत आहेत. मुंबई शहरात मंगळवारी 1442 नवीन कोरोना रुग्ण आढळून आल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या 44,931 वर पोहोचली आहे. राज्यातही गुरुवारी तब्बल  2933 नव्या रुग्णांची भर पडली आणि आतापर्यंतची रुग्णसंख्या 77 हजार 793 झाली. 

मुंबईत दिवसभरात 48 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी 33 जणांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 33 पुरुष तर 15 महिला असून 23 जण 60 वर्षावरील आहेत. 18 रुग्ण 40 ते 60 वयोगटातील होते. राज्यभरात गुरुवारी 1352 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 33 हजार 681 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 41 हजार 393 रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

राज्यात 5 लाख 60 हजार 303 लोक होम क्वारंटाईनमध्ये  आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये 73 हजार 49 खाटा उपलब्ध असून सध्या 30 हजार 623 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात गुरुवारी 123 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. बुधवारीदेखील 122 जणांचा मृत्यू झाला होता. गुरुवारी नोंद झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई 48, ठाणे 8, नवी मुंबई 6, वसई विरार 1, पालघर 1, पनवेल 1, धुळे 1, जळगाव 21, नाशिक 3, पुणे 9, सोलापूर 7, कोल्हापूर, औरंगाबाद 5, जालना 1, परभणी 2, लातूर 1, उस्मानाबाद 1, नांदेड 1, वाशिम 2 आणि यवतमाळमधील 1 जणाचा समावेश आहे. मृत्यूंपैकी 85 पुरुष तर 38 महिला आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 2710 झाली आहे.