Sun, Sep 22, 2019 22:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एक्स्प्रेसवेवर १४ स्टंटबाजांना अटक

एक्स्प्रेसवेवर १४ स्टंटबाजांना अटक

Published On: Apr 22 2019 1:53AM | Last Updated: Apr 22 2019 1:46AM
मुंबई : प्रतिनिधी

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर रॅश ड्रायव्हिंग करून स्टंटबाजी करणार्‍या चौदाजणांना शनिवारी रात्री उशिरा वांद्रे पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. त्यात एका रिक्षाचालकाचा समावेश असून त्यांच्याकडून पोलिसांनी एक रिक्षासह अकरा बाईक जप्त करण्यात आल्या आहेत. अटकेनंतर त्या सर्वांना समज देऊन न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. वांद्रे-वरळी सी लिंकसह वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर रात्रीच्या वेळेस स्टंटबाजीचे प्रकार घडत असल्याने अशा स्टंटबाजी करणार्‍या तरुणांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यात शनिवारी शब-ए-बारात असल्याने वेस्टर्न एक्सप्रेस हायवे तसेच सी लिंकवर पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी पंधरा स्वयंसेवकाची पोलिसांनी मदत घेतली. रात्री बारा ते पहाटेवर्यंत स्टंटबाजी करणार्‍या तेरा तरुणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या विरोधात चार गुन्ह्यांची नोंद करुन नंतर त्यांना अटक करण्यात आली यावेळी पोलिसांनी 11 बाईक जप्त केल्या.

कारवाई सुरू असताना हायवेवर रिक्षाच्या एका चाकावर स्टंटबाजीचा प्रकार सुरू असल्याचे तिथे गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश अनावकर यांच्या पथकातील भूषण बेळणेकर, घोरपडे, व अन्य पोलीस पथकाने समीर मुमजात अहमद शेख या रिक्षाचालकाला अटक केली. बाईकसोबत आता रिक्षाचालकही स्टंटबाजी करत असल्याचे या घटनेवरून उघडकीस आले. समीर हा नागमोडी वळण घेताना एका टायरवर रिक्षा चालवत होता. त्याच्याविरुद्ध नंतर रॅश डायव्हिंगप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक रिक्षा जप्त केली आहे. या सर्वांना रविवारी दुपारी वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.