Sun, Oct 20, 2019 11:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यातील १४ लाख विद्यार्थ्यांचे नाही बँक खाते

राज्यातील १४ लाख विद्यार्थ्यांचे नाही बँक खाते

Published On: Dec 05 2017 10:26AM | Last Updated: Dec 05 2017 10:26AM

बुकमार्क करा

रामराज : वार्ताहर

रोखीचे व्यवहार कॅशलेस करण्यावर सरकारचा भर आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवाय सरकारी अनुदान वाटपात होणारा गैरव्यवहार रोखण्यासाठी प्राथमिक शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे यंदापासून बँकेत खाते उघडण्यात येणार होते, मात्र राज्यातील तब्बल 14 लाख 41 हजार 959 विद्यार्थ्यांचे बँक खाते अजूनही उघडले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मिळणारा गणवेश निधी, विविध शिष्यवृत्त्यांचे पैसे सरकार दरबारी पडून आहेत.

प्राथमिक शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना गणवेशासाठी सरकारकडून मिळणारे अनुदान यंदापासून रोखीने न देता ते विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे सरकारने ठरविले. गणवेश निधी म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांला 400 रुपये मिळतात. राज्यातील 35 जिल्हा परिषदा आणि 22 महापालिका, नगरपालिकांच्या शाळां ध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना हा निधी लागू आहे, पण शैक्षणिक वर्षाचे दुसरे सत्र सुरू झाले तरी बँकेत खातेच नसल्याने लाखो विद्यार्थ्यांना हक्काचा गणवेश निधी मिळालेला नसल्याने गरीब पालकांना पदरमोड करून विद्यार्थ्यांना गणवेश खरेदी करावा लागला आहे. 

सर्वशिक्षा अभियानांतर्गत हा गणवेश निधी दिला जात असून येथील एका अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, पालकांना विद्यार्थ्याचे बँक खाते उघडण्यास फार अडचणी येत आहेत. काही बँका शून्य रकमेवर जॉइंट अकाऊंट उघडण्यास तयार नाहीत. या निधीची रक्कम पालकांच्या जन-धन अकाऊंटवर ट्रान्सफर करण्यास सरकारने परवानगी दिली तर बरे होईल.

गणवेश निधीसाठी 38 लाख लाभार्थी विद्यार्थी

वर्ष 2017 -18 मध्ये सर्वशिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेश योजनेचा लाभ राज्यातील एकूण 37 लाख 62 हजार 27 विद्यार्थ्यांना मिळाला आहे. या विद्यार्थ्यांपैकी 23 लाख 20 हजार 68 विद्यार्थ्यांनी बँक खाती उघडली आहेत. यातील फक्त 17 लाख 31 हजार 737 विद्यार्थ्यांच्या खात्यात गणवेश निधीची रक्कम जमा झाली असून 5 लाख 88 हजार 331 विद्यार्थ्यांचे बँकेत खाते असूनही गणवेश निधी त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही.