Wed, Jun 26, 2019 17:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण : घरतसह तिघांना न्यायालयीन कोठडी

कल्याण : घरतसह तिघांना न्यायालयीन कोठडी

Published On: Jun 19 2018 6:50PM | Last Updated: Jun 19 2018 6:50PMकल्याण : वार्ताहर

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या लाचखोर अतिरिक्त आयुक्त संजय घरत व त्याचे दोघे सहकारी ललित आमरे व भूषण पाटील या तिघांना एसीबीने मंगळवारी पुन्हा कल्याण जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजार केले. न्यायालयाने या तिघांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयीन कोठडी सुनावताच संजय घरत व अन्य दोघा साथीदारांनी न्यायलयाकडे जामीन अर्जासाठी अर्ज सादर केला. या जामीन अर्जावर एसीबीच्या तपास अधिकारी व सरकारी वकील यांचे म्हणणे ऐकण्यासाठी उद्या, बुधवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे .

लाचखोर संजय घरत व अन्य दोघा आरोपींना गत आठवड्यात बुधवारी अनधिकृत बांधकाम कामावर कारवाई टाळण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ अटक केली होती. त्यानंतर अधिक तपासासाठी एसीबीने गुरुवारी व त्या नंतर रविवारी पोलिस कोठडीची मागणी केली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर मंगळवारी दुपारी तिसर्‍यांदा कल्याण जिल्हा सत्र न्यायलयासमोर आरोपींना हजर केले. 

जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस.हातरोठे यांनी तिघा लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांनां चौदा दिवसांची म्‍हणजेच २ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्याचा निर्णय दिला. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर संजय घरत व त्याच्या दोघा सहकार्‍यांनी जामीन अर्जासाठी न्यायालयाकडे अर्ज दाखल केला.त्यावर उद्या सुनावणी होणार आहे.