Sun, Jul 21, 2019 13:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › घाटकोपरमधून दोन वर्षांत १३८ मुलींचे अपहरण

घाटकोपरमधून दोन वर्षांत १३८ मुलींचे अपहरण

Published On: Sep 08 2018 1:32AM | Last Updated: Sep 08 2018 1:32AMमुंबई : अवधूत खराडे

दै. पुढारीच्या हाती लागलेल्या या आकडेवारीचा आणि भाजपचे आमदार राम कदम यांच्या अपहरण फेम वक्तव्याचा सुतराम संबंध नसेलही. मात्र, तुम्ही मुलीला प्रपोज करा, ती नाही म्हणाली तर तिला पळवून आणतो आणि तुम्हाला देतो, असे खळबळ उडवून देणारे विधान राम कदमांनी ज्या घाटकोपरमध्ये केले त्याच घाटकोपरमधूून गेल्या पावणे दोन वर्षांत तब्बल 138 मुलींचे अपहरण झाल्याची नोंद पोलीसदप्‍तरी आहे. 

दहीहंडी उत्सवात कदम जेव्हा प्रेमात पडलेल्या मुलांसाठी त्यांच्या प्रेमातल्या मुली पळवून आणण्याची हमी देत होते त्याच वेळी हा उद्योग आधीपासून तर सुरू नाही ना, असा भयचकित करणारा प्रश्‍न अनेकांना पडला. कुतूहल शमवण्यासाठी म्हणून पोलिसांकडे विचारणा केली असता मुली पळवण्याचा एकही गुन्हा आ. राम कदम यांच्या नावावर कुठेही नोंद नाही. मात्र, त्यांच्या या मतदारसंघात मुलींचे अपहरण होण्याचे प्रमाण मात्र मोठे आहे. 

आमदार राम कदम यांच्या घाटकोपर या कार्यक्षेत्रातूनच गेल्या पावणेदोन वर्षात तब्बल 137 अल्पवयीन मुली पळविण्यात आल्या आहेत. घाटकोपर आणि पार्कसाईट पोलीस ठाण्यात दाखल अपहरणाच्या गुन्ह्यांतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

राम कदम यांनी दहीहंडीच्या दिवशी मुलीला पळवून आणून देतो असे विधान केले असलेतरी प्रत्यक्षात ते निवडून आलेल्या घाटकोपर कार्यक्षेत्रातून गेल्या आठ महिन्यांत 39 जणींचे अपहरण आणि 132 जणी हरविल्याच्या तक्रारी पालकांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात केल्या आहेत. 24 जणींचे अपहरण झाल्याची नोंद पार्कसाईट पोलीस ठाण्यात करण्यात आल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 

2017 या वर्षात 49 अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आल्याची नोंद घाटकोपर पोलीस ठाण्यात आणि 23 अल्पवयीनांच्या अपहरणाची नोंद पार्कसाईट पोलीस ठाण्यात झाली आहे. यातील सहाजणी आजही बेपत्ताच आहेत. 18 वर्षांवरील 180 जणी हरविल्याची नोंद घाटकोपर पोलीस ठाण्यात, तर पार्कसाईट पोलीस ठाण्यात 73 जणी हरवल्याबाबत नोंद झाल्याची धक्कादायक माहिती मिळते.