होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात यंदा १३१ नवी महाविद्यालये

राज्यात यंदा १३१ नवी महाविद्यालये

Published On: Mar 05 2018 1:50AM | Last Updated: Mar 05 2018 1:45PMमुंबई : प्रतिनिधी

राज्यातील पारंपरिक विद्यापीठांनी सादर केलेल्या बृहत आराखड्यानुसार राज्यात पुढील वर्षी एकूण १३१ नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने कायम विनाअनुदान तत्त्वावर मंजुरी दिली आहे.

नवे अभ्यासक्रम, महाविद्यालये तसेच तुकड्यांना राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलेल्या बृहत आराखड्यात विद्यापीठांनी भौगोलिक परिस्थिती, त्या परिसराची गरज, संशोधनविषयक धोरण, कौशल्य विकास, शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागासाठी विकासाचे निकष पाहूनच उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे सादर केले होते. त्यानुसार जूनपासून वर्ग सुरू करण्यासाठी ही मंजुरी देण्यात आली आहे. राज्यात आजघडीला साडेचार हजारहून अधिक महाविद्यालये कार्यरत आहेत. यंदा आणखी  या महाविद्यालयांची भर पडणार आहे. अटी व शर्तीनुसार या महाविद्यालयांना २८ फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. विद्यापीठनिहाय तपशीलवार माहिती या शासन निर्णयात देण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठांतर्गत २२ महाविद्यालये 

मुंबई विद्यापीठाअंतर्गत २२ महाविदयालयांचा समावेश आहे. त्यामध्ये मुंबईत एकूण ७ महाविद्यालये, ठाण्यात ८, पालघरमध्ये ३, रायगड, रत्नागिरीमध्ये २ तर सिंधुदुर्गमध्ये १ महाविद्यालय.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत २८ महाविद्यालये     

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत २८ नव्या महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात १६, अमदनगर जिल्ह्यात ५, नाशिक जिल्ह्यात ७ महाविद्यालयांचा समावेश आहे. 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती   

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाअंतर्गत एकूण १७ महाविदयालयांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये अमरावतीत २, अकोल्यात २, बुलढाण्यात ५ तर यवतमाळमध्ये ८ महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे.

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाअंतर्गत एकूण १३ नव्या महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 6, सांगली जिल्ह्याती 6 आणि साताऱ्यातील 1 महाविदयालयाचा समावेश आहे.

सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

सोलापूर विद्यापीठाअंतर्गत करमाळा, पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात प्रत्येकी एक अशा तीन महाविद्यालयांचा समावेश आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत एकूण 22 महाविद्यालयांचा समावेश आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात 12, जालन्यात 6 तर उस्मानाबाद आणि बीडमध्ये प्रत्येकी 2 महाविद्यालये येतात.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत कंधार, बिलोली तालुक्यात (जि. नांदेड) प्रत्येकी एक आणि वसमत तालुक्यात (जि. हिंगोली) एका महाविद्यालयाला मान्यता.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाअतंर्गत धुळे आणि जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी एका महाविद्यालयाचा समावेश आहे. 

श्रीमती नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई

श्रीमती नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई या विद्यापीठाअंतर्गत एकूण 5 नव्या महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये जालन्यात 2, राधानगरी तालुक्यात (कोल्हापूर) 2 तर नागपुरात 1 महाविद्यालयाचा समावेश आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाअंतर्गत एकूण 11 महाविद्यालयांचा समावेश आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यात 4, वर्धा जिल्ह्यात 3, गोंदिया जिल्ह्यात 3 तर भंडारा जिल्ह्यातील एका महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे.

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली

गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत 5 महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील 4 आणि चंद्रपुरातील एका महाविद्यालयाचा समावेश आहे.