होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गोरेगावात फ्लॅटसाठी घेतलेल्या १३१ कोटींचा बिल्डरकडूनच अपहार

गोरेगावात फ्लॅटसाठी घेतलेल्या १३१ कोटींचा बिल्डरकडूनच अपहार

Published On: May 21 2018 1:37AM | Last Updated: May 21 2018 1:36AMमुंबई : प्रतिनिधी

गोरेगाव येथे एका इमारतीच्या प्रोजेक्टमध्ये 465 लोकांकडून फ्लॅटसाठी घेतलेल्या सुमारे 131 कोटी रुपयांचा अपहार करुन फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी एचडीएल आणि गुड आशिष कंन्ट्रक्शन कंपनीच्या संचालकासह इतर आरोपींविरुद्ध अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. गेल्या आठ वर्षांत हा संपूर्ण घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्यानंतर या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

गोरेगाव येथील सिद्धार्थ नगरमध्ये द मिडोज या इमारतीचे बांधकाम एचडीएल आणि गुड आशिष कंन्ट्रक्शन कंपनीकडून सुरु होते. या दोन्ही कंपनीने भागीदारीत हा व्यवसाय सुरु करुन त्यातील फ्लॅटच्या विक्रीसाठी जाहिरात केली होती. त्यामध्ये अनेक ग्राहकांनी आपले फ्लॅट बुक केले होते. मात्र, बिल्डरानी कुणालाही फ्लॅटचा ताबा न देता घेतलेल्या रक्‍कमेचा परस्पर अपहार केला.

अमर अजवेकर यांच्या तक्रार अर्जावरुन गोरेगाव पोलिसांनी संबंधित दोन्ही कंपनीच्या संचालकासह इतर आरोपींविरुद्ध 409, 420, 120 ब, 3, 4, 5, 8, 13 मोफा कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याने त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.