Tue, Aug 20, 2019 04:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अकरावीचा अभ्यास करतेय 13 वर्षांची मुलगी!

अकरावीचा अभ्यास करतेय 13 वर्षांची मुलगी!

Published On: Sep 04 2018 1:18AM | Last Updated: Sep 04 2018 1:17AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

वयाच्या 13 व्या वर्षी उत्तर प्रदेशातील एका मुलीने मुंबईतील ब्रीच कँडी येथील सोफिया कॉलेजमध्ये अकरावीमध्ये प्रवेश मिळवला आहे. सदर मुलगी उत्तर प्रदेशच्या फिरोझाबाद शहरातील असून तिने सीबीएसई दहावीच्या परीक्षेत तब्बल 85 टक्के गुण मिळवले आहेत. 

या मुलीचे (विनंतीवरून मुलीचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे) वडील व आजोबा या दोघांचीही कारकीर्द शैक्षणिक क्षेत्रातील आहे. ही मुलगी अतिशय हुशार असल्याने तिला शाळेत थेट तिसरीच्या वर्गात प्रवेश मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्या वडिलांच्या मदतीने तिने आपल्या शालेय जीवनात प्रत्येक वर्षी चांगले यश मिळवले, असे तिचे नातेवाईक सांगतात. सर्वसाधारणपणे अकरावीमध्ये प्रवेश घेणारी मुले ही 16 वर्षांची असतात. 

दहावीच्या परीक्षेत 85 टक्के गुण मिळाल्याने तिला केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून महाविद्यालयातील कला शाखेत प्रवेश मिळाला असून महिनाभरापासून ती वर्गामध्ये हजेरी लावत आहे. ‘जेव्हा ही मुलगी आमच्याकडे आली तेव्हा तिला आम्ही महाविद्यालयात प्रवेश दिला. मात्र तो तात्पुरत्या स्वरुपाचा असेल. सध्या ती नियमितपणे वर्गात हजर राहते. बारावीच्या परीक्षेस बसवायचे की नाही हे तिच्या क्षमतेवर अवलंबून असेल. सदर महिला महाविद्यालय असल्याने या मुलीला आम्ही सर्वतोपरी मदत करणार आहोत, असे प्राचार्या आनंदा अमृतमहल यांनी सांगितले. ज्या मुलांनी महाराष्ट्राशिवाय इतर राज्यांतून दहावीची परीक्षा दिली असेल त्यांच्याकडे या महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी विभागीय कार्यालयाचे पात्रता प्रमाणपत्र असणे आवश्यक असते.

दरम्यान, ही मुलगी सध्या गोरेगाव येथे आपल्या नातेवाईकांकडे रहात असून दक्षिण मुंबईत असलेल्या आपल्या कॉलेजला ती ट्रेनने जाते. तिच्या वर्गातील सर्वांपेक्षा ती  लहान असली तरी महाविद्यालयीन जीवनात ती निश्‍चितपणे यशस्वी होईल असा तिच्या पालकांना विश्‍वास वाटतो.

दहावी किंवा बारावीच्या परीक्षेला बसण्यासाठी किमान वयोमर्यादेची कोणतीही अट नाही. बारावीची परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्याने नियमितपणे कॉलेजला हजेरी लावायला हवी. अशा प्रकारची घटना यापूर्वी आम्हाला अनुभवयास आली नाही. मात्र तिची सर्व कागदपत्रे परिपूर्ण असतील तर तिला बोर्डाच्या परीक्षेला बसण्यास परवानगी दिली जाईल, असे राज्य बोर्डाच्या मुंबई विभागाचे सचिव सुभाष बोरसे यांनी सांगितले.