Fri, Jul 19, 2019 00:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 13 लाख ठाणेकरांना मिळणार हक्काचे घर !

13 लाख ठाणेकरांना मिळणार हक्काचे घर !

Published On: Mar 15 2018 1:31AM | Last Updated: Mar 15 2018 1:28AMठाणे : पुढारी वृत्तसेवा

क्लस्टरच्या माध्यमातून संपूर्ण शहराचाच पुनर्विकास करणारे ठाणे शहर हे देशातील पहिले शहर ठरले आहे. क्लस्टरच्या माध्यमातून तब्बल 13 लाख नागरिकांना  हक्काची घरे मिळणार आहेत.  धोकादायक इमारतींमध्ये राहणार्‍या नागरिकांना केवळ  आपल्या हक्काची घरेच मिळणार नाही तर,  रोजगारांच्या मोठ्या प्रमाणात संधी या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.  विकास आराखड्यातील ग्रीन झोन, तलाव, रस्ते या सर्वच स्तरांवर विकास होणार आहे. 

पहिल्या टप्प्यात ही योजना 5 सेक्टरमध्ये राबविली जाणार असून त्या अंतर्गत तब्बल 23 टक्के ठाण्याचा पुनर्विकास केला जाणार आहे. या पहिल्या पाच सेक्टरमध्ये लोकमान्य नगर, राबोडी आणि वागळे इस्टेट या भागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सीआरझेड अंतर्गत येणार्‍या बांधकामांचाही प्रश्‍न  निकाली निघणार आहे. क्लस्टरसाठी 43  अर्बन रिन्युवल प्लॅन तयार करण्यात आले असून  ऑक्टोबरपर्यंत शहरातील पहिल्या क्लस्टरच्या कामाला सुरूवात होईल, अशी माहिती पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली.  

ठाणे  महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात बुधवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी क्लस्टर योजनेचे  सादरीकरण पालकमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या  उपस्थितीमध्ये केले. पहिल्या पाच सेक्टरचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून त्यात लोकसंख्येच्या मानाने कोणत्या सोई सुविधा उपलब्ध आहेत, रुग्णालये, पोलीस ठाणे, गार्डन, आदींसह इतर सुविधा उपलब्ध आहेत की नाही  याचा अभ्यास करण्यात आला आहे. नव्या अर्बन रिनीव्हल प्लॅनमध्ये शहराच्या विकास आराखड्यातील शिल्लक राहिलेल्या बाबींचा देखील समावेश असेल. बाधीत झालेली आरक्षणे देखील या माध्यमातून विकसित केली जाणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.  

ही घरे बांधतांना 4 पर्यंत एफएसआय दिला जाणार आहे. परंतु एखाद्या ठिकाणी तो बसत नसेल किंवा जास्तीचा एफएसआय असेल तर विकासकाला दुसर्‍या जागेवर वाढीव एक एफएसआय लोड करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विकासकदेखील ही योजना राबविण्यासाठी पुढे येतील, अशी आशा आयुक्तांनी व्यक्त केली.

क्‍लस्टर पुनर्विकासात आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक सुविधा उपलब्ध होतील.  क्रीडा, सांस्कृतिक, सुरक्षितता दळणवळण, प्रत्येक समाजाची केंद्रे, महिला बचत गटांसाठी स्वतंत्र जागा त्याचप्रमाणे समाजाच्या सर्व दैनंदिन गरजा पुरविणारे कम्युनिटी सेंटर, सिटी सेंटर, टाऊन सेंटरचीदेखील सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या क्लस्टर योजनेमु़़ळे जुन्या झालेल्या धोकादायक अनधिकृत इमारतींना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. अनधिकृत इमारतींचा पुनर्विकास करणे शक्य नसल्याने क्लस्टरच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या इमारतीचा पुनर्विकास करणे शक्य होईल. शिवाय अधिकृत धोकादायक इमारतींना देखील या योजनेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. तसेच सीआरझेड, वनविभाग आदी जागांवरील रहिवाशांनादेखील या योजनेत समावून घेतले जाणार असल्याने ग्रीन बेल्ट वाढला जाणार असून सीआरझेड आणि वनजमिनी या मोकळ्या होणार आहेत. त्या ठिकाणी ग्रीन बेल्ट वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. 

तलावांनाही पुनरुज्जीवन

तलावांचे शहर म्हणून ठाणे शहराची ओळख असून क्लस्टर योजनेच्या माध्यमातून आता शहरातील तलावांनादेखील पुनरुज्जीवित करण्यात येणार आहे. जे तलाव बुजविण्यात आले आहेत, किंवा ज्या तलावांच्या ठिकाणी अतिक्रमणे झाली असतील ती काढून तलाव पुनर्जीवित करण्यात येतील, असेही आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यात 23 टक्के क्षेत्र क्लस्टरच्या माध्यमातून विकसित केले जाणार असले तरी पुढील दोन वर्षात 70 टक्के क्षेत्र हे क्लस्टरच्या माध्यमातून विकसित केले जाईल, असा विश्‍वासही यावेळी आयुक्तांनी व्यक्त केला. या क्लस्टरच्या जोडीला वॉटर फ्रन्ट डेव्हलपमेंट, अंतर्गत जलवाहतूक आदी सुविधादेखील उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शहरातील ऐतिहासिक वास्तूदेखील जपल्या जाणार आहेत.