Fri, Apr 19, 2019 12:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मेट्रो, मोनो रेल, ट्रान्स हार्बरसाठी १२००० कोटींपर्यंतच्या कर्जास केंद्राची मुभा

मेट्रो, मोनो रेल, ट्रान्स हार्बरसाठी १२००० कोटींपर्यंतच्या कर्जास केंद्राची मुभा

Published On: Feb 05 2018 1:47AM | Last Updated: Feb 05 2018 1:09AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

मुंबईतील मेट्रो-मोनो रेल, ट्रान्स हार्बर, सीलिंक व कोस्टल रोड पूर्ण करण्यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बारा हजार कोटी रुपये कर्ज घेण्यास राज्य सरकारला मुभा दिली आहे. पुर्वी ही कर्जमर्यादा 11 हजार कोटी रुपयांपर्यंत होती. 

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाचवेळी करण्याबाबत दिल्लीत हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपाशासीत राज्य सरकारने केंद्र सरकारच्या या प्रयत्नाला होकार देण्याचे जवळपास निश्‍चित केले आहे. त्यामुळे या निवडणुकांपुर्वी विशेषतः मुंबईतील विकासकामे पुर्ण करण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर दिला आहे.

मुंबईतील मेट्रोसह मोनो रेल्वे,  ट्रान्स हार्बर सीलिंक व कोस्टल रोडसारखी 1 लाख कोटी रुपये खर्चाची विकासकामे सुरु करण्यात आली आहेत. या रकमेमध्ये ही कामे होणार नसल्यामुळे सरकारला आणखी निधीची आवश्यकता आहे. सध्या महाराष्ट्रावर सुमारे 4 कोटी 13 लाख रुपयांचे कर्ज आहे. 

काँग्रेस आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये ऋण स्टॉक 2.69 लाख कोटी रुपये होता, आता त्यामध्ये दुप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस केलेल्या मागणीनुसार अर्थमंत्री जेटली यांनी 12 हजार कोटी रुपये कर्ज घेण्यास मान्यता दिली असल्याची माहिती वित्त विभागातील अधिकार्‍याने दिली.

कोणत्याही राज्याला आपल्या महसुलाच्या 10 टक्केपेक्षा अधिक कर्ज घेता येत नाही. परंतु 2015-16 मध्ये राज्य सरकारने ही मर्यादा ओलांडली होती. 13.93 टक्केपर्यंत कर्ज घेण्यात आले होते. यावर्षी राज्याच्या महसुलामध्ये तुट येण्याची शक्यता आहे. 2016-17 च्या अर्थसंकल्पानुसार 3 हजार 644 कोटी रुपये महसुलात तुट आहे. यंदा हा आकडा 14 हजार 377 कोटीपर्यत जाऊ शकतो. हा धोका ओळखुन राज्य सरकारने सावधपणे पावले उचलत केंद्राकडुन कर्ज वाढवुन घेण्याबाबत परवानगी मिळवली आहे, असेही हा अधिकारी म्हणाला.