Fri, Jul 19, 2019 17:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सहा. लेखाधिकारी पदाचे ११६ कर्मचारी अजून प्रतीक्षेतच

सहा. लेखाधिकारी पदाचे ११६ कर्मचारी अजून प्रतीक्षेतच

Published On: May 21 2018 1:52AM | Last Updated: May 21 2018 1:47AMमुंबई : साईनाथ कुचनकार

राज्यात वित्त विभागांतर्गत येणार्‍या लेखाधिकारी आणि सहाय्यक लेखाधिकार्‍यांची पदे मोठ्या संख्येने रिक्त असल्याने या पदांच्या नियुक्तीसाठी विविध विभागांतील कर्मचार्‍यांची मे 2015 मध्ये एमपीएससीद्वारे परीक्षा घेण्यात आली. यात 302 कर्मचारी पास झाले. दोन वर्षांनंतर यातील काहींना शासनाने नियुक्त केले, मात्र 116 पात्र कर्मचार्‍यांना अद्यापही नियुक्त केले नसल्याने सदर कर्मचारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. विशेष म्हणजे, राज्यात आजच्या घडीला लेखाधिकारी व सहाय्यक लेखाधिकारी पदांची तब्बल 519 पदे रिक्त आहेत. त्यामुळे वित्त विभागाच्या कामकाजावर परिणाम होत आहे. या पात्र कर्मचार्‍यांनी शासनाला वेळोवेळी विनंती करूनही त्यांच्या नियुक्तीकडे दुर्लक्ष केल्याने शासनाच्या धोरणाविषयी या कर्मचार्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यातील वित्त व लेखा विभागातील प्रशासकीय बाबींमध्ये एकसूत्रता यावी, या विभागाचे अंदाजपत्रक, लेखन व लेखांकन करणे, वित्तीय सल्ला देण्याच्या हेतून लेखाधिकारी आणि सहाय्यक लेखाधिकार्‍यांची 1965 च्या शासन निर्णयान्वये पदे मंजूर करण्यात आली आहेत. सहाय्यक लेखाधिकारी पद हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येत असलेल्या परीक्षेमधून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून भरण्यात येते. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कर्मचार्‍यांची मे 2015 मध्ये परीक्षा घेतली. या परीक्षेतील उत्तीर्ण 207 उमेदवारांची ऑगस्ट 2017 मध्ये राज्यातील विविध भागांमध्ये लेखा व कोषागरे विभागाच्या संचालकांनी नियुक्ती केली आहे. मात्र याच पात्र उमेदवारांच्या यादीतील 116 उमेदवारांची अद्यापही नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे या कर्मचार्‍यांमध्ये नाराजी पसरली आहे. विभागात रिक्त पदे असतानाही नियुक्तीस विलंब का, असा प्रश्‍न या कर्मचार्‍यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, या कर्मचार्‍यांनी संबंधित विभागाला नियुक्तीनंतर न्यायालय आणि शासनाच्या अटी, शर्तीच्या अधिन राहण्याचे हमीपत्रही दिले आहे, मात्र शासनाने या कर्मचार्‍यांकडे कायम दुर्लक्ष केले आहे.

विभागात 519 पदे रिक्त

राज्यात सहाय्यक लेखाधिकारी आणि लेखाधिकार्‍यांची तब्बल 519 पदे रिक्त आहेत. त्यामुळे या विभागाच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. तर दुसरीकडे एमपीएससीद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेत पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे या विभागाचा नेमका हेतू काय, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

पदोन्नतीमध्येही होणार अन्याय

मे 2015 मध्ये एमपीएससीने घेतलेल्या परीक्षेत पात्र कर्मचार्‍यांपैकी 207 जणांची वित्त विभागाच्या संचालकांनी 10 ऑगस्ट 2017 ला नियुक्ती केली आहे. मात्र 116 उमेदवारांना अद्यापही नियुक्तीपत्र दिले नसल्याने पदोन्नतीमध्येही या कर्मचार्‍यांवर अन्याय होणार आहे. ज्याप्रमाणे परीक्षा एकत्र घेतली, त्याप्रमाणे नियुक्तीही एकत्र करायला हवी होती, मात्र यातही या कर्मचार्‍यांवर अन्याय करण्यात आला आहे. यासंदर्भात या कर्मचार्‍यांनी संचालक लेखा, कोषागार मुंबई तसेच वित्त मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावाही केला आहे. मात्र काहीच उपयोग झाला नसल्याचे कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे.