Sun, Nov 18, 2018 09:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईतील ११० शांतता क्षेत्रे जाहीर

मुंबईतील ११० शांतता क्षेत्रे जाहीर

Published On: Aug 27 2018 1:38AM | Last Updated: Aug 27 2018 1:38AMमुंबई : प्रतिनिधी

राज्य सरकारने बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील 110 शांतता क्षेत्रांची यादी जाहीर केली आहे. या ठिकाणी रात्री दहा वाजल्यापासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत लाउड स्पिकर लावणे, वाद्ये वाजविणे वा फटाके फोडण्यासारख्या ध्वनिप्रदूषणाला पूर्णपणे  बंदी घातली आहे. हा  बंदी  आदेश मोडणार्‍यांना पाच वर्षे कैद किंवा एक लाख रुपये दंड वा दोन्ही शिक्षा एकदम देण्याची तरतूद आहे. 

ध्वनिप्रदूषणाबाबत बंदी आदेशाची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नसल्याबाबत न्यायालयाने अनेक वेळा सरकारला फटकारले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आताही सणाच्या दिवसांत ध्वनिप्रदूषण होऊ नये यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. शहर व उपनगरांतील 110 ठिकाणे ही शांतताक्षेत्रे म्हणून जाहीर करतानाच त्याठिकाणी बंदी आदेशाचा भंग होत असेल तर त्याबाबत करावयाच्या तक्रारीची ठिकाणे तेथील संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत. बंदी आदेशाची काटेकोर अंमलबजावणी  करण्यासाठीची दक्षता घेण्यात आली आहे. हे आदेश काढताना शांतता क्षेत्राची वर्गवारी व त्याप्रमाणे असलेली  डेसिबलची मर्यादाही ठरवून देण्यात आली आहे. 

ध्वनिप्रदूषण कायदा मोडणार्‍यांना पाच वर्षे कैद वा एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा एकाचवेळी सुनावण्याची तरतूद आहे.एकदा शिक्षा होऊनही परत कायदा मोडणार्‍यांना दररोज 5 हजार रुपये दंडाची शिक्षा देण्याची तरतूद  आहे. तर शिक्षा झाल्यापासून एक वर्षाच्या काळात परत अशाच स्वरूपाचा गुन्हा केल्यास 7 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.