होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उल्हासनगरात 11 वर्षीय मुलाची गळा चिरून हत्या

उल्हासनगरात 11 वर्षीय मुलाची गळा चिरून हत्या

Published On: Jul 18 2018 1:53AM | Last Updated: Jul 18 2018 1:35AMउल्हासनगर : वार्ताहर 

उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथील माणेरागाव परिसरात राहणार्‍या अवघ्या 11 वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हर्ष गणेश आल्हाट (11) असे मृत मुलाचे नाव आहे. हर्ष विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माणेरा गावात पालकांसोबत राहत होता. त्याचे आई- वडील हे येथील जय जनता कॉलनी भागात जीन्सच्या कारखान्यात काम करतात. सोमवारी सायंकाळी गणेश, त्याची पत्नी कामावरून घरी गेल्यावर त्यांना हर्ष दिसला नाही. त्यामुळे त्यांनी हर्षचा सर्वत्र शोध घेतला. पण, हर्षचा कोणताही ठावठिकाणा लागत नसल्याने त्यांनी जय जनता कॉलनी गाठली. येथे अनेकदा हर्ष खेळायला येत असे. येथील झाकीर हुसेन अन्सारी यांच्या खोलीत भाड्याने राहणार्‍या कामगारांच्या घरात हर्ष खेळायला जात असे. त्यामुळे गणेश आणि त्याच्या पत्नीने जय जनता कॉलनी गाठली. पण, येथे त्यांना हर्षचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात दिसला. भाजी कापण्याच्या सुरीने त्याचा गळा चिरण्यात आला होता. 

गणेशने दिलेल्या फिर्यादी वरून  अपहरण, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम पलंगे यांच्या मार्गदर्शनाखाली जय जनता कॉलनीमध्ये भाड्याने राहणार्‍यांपैकी चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे  पोलीस निरीक्षक मोहन खंडारे यांनी सांगितले.