Thu, Apr 25, 2019 05:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वय वर्षे ११ : ७५ पक्ष्यांच्या प्रजातीचे डॉक्युमेंटेशन

वय वर्षे ११ : ७५ पक्ष्यांच्या प्रजातीचे डॉक्युमेंटेशन

Published On: Jun 04 2018 9:05AM | Last Updated: Jun 04 2018 9:05AMमुंबई  : पुढारी वृत्तसेवा

मुलांचं विश्‍व सध्या टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाइलसारख्या गॅझेटवर सीमित झाल्याने हा चिंतेचा विषय ठरला असतानाच, चेंबूरमधील 11 वर्षांचा एक मुलगा मात्र पक्षी निरीक्षणामध्ये गुंतला असून तो इतरांसाठी ‘आयकॉन’ ठरला आहे. त्याने आपल्या डिजिटल कॅमेर्‍यामध्ये मुंबई विभागातील विविध प्रजातीचे जवळपास 75 पक्षी कैद केले असून तो बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या सर्वात तरुण पक्षी निरीक्षकांपैकी एक आहे. जोशुआ बॉस्को असे या मुलाचे नाव असून तो विद्याविहारच्या सोमय्या स्कूलमध्ये पाचवीच्या वर्गात आहे.

जोशुआला वयाच्या चौथ्या वर्षांपासून पक्षी निरीक्षणाचा छंद जडला. तर पुढच्याच म्हणजे पाचव्या वर्षी तो पॅन-इंडिया वाईल्डलाईफ रिसर्च ऑर्गनायझेशनचा सदस्य झाला. पक्षीतज्ज्ञ व्हायचं त्याचं स्वप्न आहे. त्यानं ‘बर्ड बुक’ तयार केले असून त्यामध्ये तो नवीन पाहिलेल्या पक्षांची माहिती, निरीक्षणं नोंद किंवा रेकॉर्ड करून ठेवतो. त्यानं केलेलं हे डाक्युमेंटेशन वर्गातील विद्यार्थ्यांना विविध पक्षांची माहिती मिळण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतं.

आपल्या छंदाविषयी जोशुआ सांगतो, की, दैनंदिन जीवनात मला असंख्य पक्षांचे आवाज ऐकायला मिळतात, पण त्यांच दर्शन होत नाही. अशा वेळी त्यांचे हे आवाजच मला त्यांचा शोध घेण्यास भाग पाडतात. मॅगपाई रॉबीन या पक्षाचा आवाज, तर मला दररोज ऐकायला मिळतो. तो आवाज ऐकला की, मी त्याच्या डोळ्याचा रंग, पंख पाहण्यास आतुर असतो. त्याशिवाय ते आपले घरटे कसे बांधतात, याबाबतही मला प्रचंड कुतूहल असते.

जोशुआला पक्षीनिरीक्षण कसे करायचे, याचे प्राथमिक धडे त्याच्या काकांकडून मिळाले. शिवाय त्यांनी त्याला पहिला डिजिटल कॅमेराही भेट दिला. मे 2015 मध्ये 10 दिवसांसाठी तो आपल्या काकांबरोबर जामनगरला पक्षी निरीक्षण करण्यासाठी गेला होता. त्यावेळी तो सात वर्षांचा होता. जामनगरच्या त्याच्या या पक्षी निरीक्षण भेटीनं त्याच्या छंदाला मोठी चालना मिळाली. सुट्टीच्या दिवसात आता तो देशातील विविध जंगलात पक्षांचे निरीक्षण करण्यात गुंतलेला असतो.

अलीकडेच सुट्टीनिमित्त जोशुआचं कुटुंब अमेरिकेला गेल होतं. त्यावेळी विविध प्रेक्षणीय ठिकाण पाहताना त्याने अनेक पक्षांचे फोटो काढले व शाळेतील आपल्या मित्रांना मोठ्या अभिमानाने दाखवले आहेत. 2015 मध्ये शाळेने त्याच्या या छंदाची दखल घेऊन त्याला बालवाडीतील मुलांना पक्षांचे फोटो दाखवण्याबरोबरच त्यांची माहिती देण्यासाठी नियुक्ती केली.

मी एखादा नवीन पक्षी पाहतो, त्यावेळी मला त्याच्या प्रजातीविषयी नवीन माहिती मिळते. जसे की, त्याचं मूळ काय आहे? तो स्थलांतरीत आहे का? त्याचं खाद्य काय आहे? असे पक्षी म्हणजे माझ्यासाठी दररोज एक नवीन स्टोरी असते. जी मला  कमालीचा आनंद देते. - जोशुआ बॉस्को, छोटा पक्षीतज्ज्ञ

जोशुआनं प्रथम रेड वेन्टेड बुलबुल व कॉपरस्मीथ बारबेट या पक्षांची जोडी पाहिली. हे पक्षी आमच्या स्वयंपाकघराच्या खिडकीबाहेर असलेल्या झाडावर नियमित यायचे. स्वयंपाकघराच्या खिडकीत बसून पक्षीनिरीक्षणामध्ये तो गुंगून जायचा. - शिल्पा बॉस्को, जोशुआची आई.