Sat, Feb 16, 2019 10:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघरच्या बालसुधारगृहातून 11 अल्पवयीन मुली पसार

पालघरच्या बालसुधारगृहातून 11 अल्पवयीन मुली पसार

Published On: Jun 27 2018 2:12AM | Last Updated: Jun 27 2018 1:55AMमनोर : वार्ताहर

पालघर तालुक्यातील लालोंडे येथील रेस्क्यु फाऊडेशन या मुलींच्या बाल सुधारगृहातून 11 अल्पवयीन मुलींनी सुधारगृहाचे जाळीदार तारांचे  कंपाऊंड तसेच पुढील पाच ते सहा फू ट उंच भिंतीवरून उड्या मारून पलायन केल्याची घटना मंगळवारी पहाटे 4 च्या सुमारास उघडकीस आली. या बाबत मनोर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.

लालोंडेच्या रेस्क्यु फाऊंडेशन या संस्थेत बाल सुधारगृह चालवले जाते. न्यायालयाने अल्पवयीन मुली तसेच वेश्याव्यवसायात अडकलेल्या महिलांना शिक्षा सुनावल्यानंतर ही संस्था त्यांना सुधारण्यासाठी न्यायालयीन कार्यवाहीची पूर्तता करून त्यांना ताब्यात घेते.त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी न्यायालयाकडून एका महिला पोलीस अधिकार्‍याची नियुक्ती देखील केली आहे. येथे मुलींना शिवणकाम, मेहंदी काढणे तसेच अन्य स्वावलंबी होण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षणे दिली जातात.

या सुधारगृहातून गेल्या तीन ते चार महिन्यांपासून मुलींचे पलायन सुरू असल्याच्या घटना उघडकीस येत आहे. त्यामुळे सुधारगृहात नेमके काय सुरू आहे? हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मुली कोणत्या कारणामुळे पलायन करतात, ते कारण अद्यापि स्पष्ट झाले नाही.गेल्या वर्षी दोन वेळा येथील मुलीनी पलायन केले होते. तसेच दीड महिन्यापूर्वीही  एका अल्पवयीन मुलीने पलायन केल्याने ही संस्था चर्चेत आली होती. त्यावेळी त्या मुलीला बोईसर रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेण्यात आले होते.