Sun, Jul 21, 2019 16:14
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आठ मुली अजूनही पसारच

आठ मुली अजूनही पसारच

Published On: Jun 28 2018 1:32AM | Last Updated: Jun 28 2018 12:54AMमनोर : वार्ताहर 

पालघर तालुुक्यातील लालोंडे रेस्क्यु फाऊडेशन या मुलींच्या बाल सुधारगृहातून मंगळवारी पळालेल्या 11 अल्पवयींन मुलींपैकी तिघींना पकडण्यात पोलिसांना यश आले. उर्वरित 8 मुलींचा अद्यापि तपास लागला नाही.

लालोंडे रेस्क्यु फाऊडेशनच्या बाल सुधारगृहात राहणार्‍या संबंधित 11 मुली मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास एक जाळीदार कंपाऊंड तसेच भिंतीवरून उड्या मारून पसार झाल्या. यामुळे येथील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न चव्हाट्यावर आला. याप्रकरणी संस्थेने दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, मनोर पोलिसांनी लालोंडे येथील जंगलातून तिन मुलींना मंगळवारी रात्री ताब्यात घेतले. उर्वरित 8 मुलींचा अद्याप तपास लागू शकला नाही.

या बाल सुधारगृहात न्यायालयाने अल्पवयीन मुली तसेच वेश्याव्यवसायात अडकलेल्या महिलांना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना सुधारण्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता करून आणण्यात येते. त्यांना संस्थेकडून शिवणकाम, मेहंदी काढणे, ब्युटी पार्लर तसेच अन्य स्वावलंबी होण्यासाठी आवश्यक व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते. 

मात्र, गेल्या तीन-चार वर्षांपासून या बाल सुधारगृहातून मुली पळून जाण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे येथे नेमके काय चालले आहे? हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. गेल्या वर्षीही दोन वेळा येथील मुली पळून गेल्या होत्या, तसेच दीड महिन्यापूर्वीही एका अल्पवयीन मुलीने पलायन केल्याने ही संस्था चर्चेत आली होती. यावेळी त्या मुलीला बोईसर रेल्वे स्टेशनवर पकडण्यात आले होते.