Sun, May 26, 2019 09:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत एका वर्षात झाले 11,763 नैसर्गिक गर्भपात

मुंबईत एका वर्षात झाले 11,763 नैसर्गिक गर्भपात

Published On: Jun 06 2018 2:09AM | Last Updated: Jun 06 2018 2:02AMमुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्रातील गावखेड्यात नैसर्गिकरीत्या होणार्‍या महिलांच्या गर्भपाताची संख्या सध्या वाढल्याचे दिसून येत आहे. 2017-18 या वर्षांत महाराष्ट्रात 60,495 महिलांचा विविध कारणास्तव नैसर्गिक गर्भात झाल्याचे उघड झाले आहे. शिवाय मुंबईसारख्या शहरातही नैसर्गिक गर्भपाताचे प्रमाण धडकी भरवणारे आहे. एक वर्षाच्या कालावधीत सुमारे 11763 इतक्या मोठ्या प्रमाणात नैसर्गिक गर्भापात झाल्याची धक्कादायक आकडेवारी केंद्रीय आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर नोंदवण्यात आली आहे. 

संपूर्ण महाराष्ट्रात 2017-18 या एक वर्षाच्या काळामध्ये 60,495 महिलांचा नैसर्गिक गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात गर्भपात होण्याचे प्रमाण अधिक आहे. 

राज्याच्या ग्रामीण भागात 42,205 महिलांचे गर्भपात झाले, नैसर्गिक गर्भपात होण्याचे ग्रामीण भागातील प्रमाण हे प्रत्येक पाच महिलांच्या मागे एक महिला असे आहे. डॉक्टरांच्या माहितीप्रमाणे, ग्रामीण भागात वैद्यकीय सोयी-सुविधांचा अभाव आणि अशिक्षितपणा आणि पौष्टीक आहार न मिळणे ही मिसकॅरेजचे प्रमाण वाढण्याची प्रमुख कारणे आहेत.

देशभरात गेल्या वर्षभरात 5,55,213 महिलांचे मिसकॅरेज झाले. ज्यात पश्‍चिम बंगालमध्ये सर्वाधिक म्हणजेच 75,202 महिलांचा नैसर्गिक गर्भपात झाला. या खालोखाल महाराष्ट्रात याचे प्रमाण 60,495 असून राजस्थानात 57,206 इतके आहे. मुंबईतही वाढती स्पर्धा आणि धकाधकीची जीवनशैली यामुळे हार्मोन्समध्ये बदल होऊन मिसकॅरेजचे प्रमाण सध्या वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 2017-18 या वर्षात मुंबईत 11,763 महिलांचे मिसकॅरेज झाले, पुण्यात 8,571, तर 5,528 गर्भवती महिलांचे तिसर्‍या किंवा पाचव्या महिन्यात मिसकॅरेज झाल्याचे समोर आले आहे. केंद्रीय आरोग्य विभागाच्या हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिमद्वारे (एचएमआयएस) मिळालेल्या आकडेवारीद्वारे ही बाब समोर आली.

ग्रामीण भागातच नव्हे, तर मुंबईसारख्या शहरी भागातही मिसकॅरेजचे प्रमाण वाढत आहे. तापमानात होणारी प्रचंड वाढ हे यामागील मुख्य कारण. याशिवाय शहरी भागात बहुतेक महिला कामानिमित्त घराबाहेर पडतात. कामासाठी तासन्तास प्रवास करतात. रस्त्यावरील खड्डे यामुळे देखील मिसकॅरेजचे प्रमाण वाढत असल्याचे मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयातील स्त्रीरोग विभागातील प्राध्यापक डॉ. निरंजन चव्हाण यांनी सांगितले.

डॉ. चव्हाण पुढे म्हणतात, फॅमिली प्लॅनिंग करताना लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. पाळी चुकल्यास डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेणे गरजेचे आहे. गर्भारपणात पौष्टीक आहार, पालेभाज्यांचे सेवन करावे. पाणी जास्त प्रमाणात प्यावे. आहारात पनीर असणे उत्तम. गरोदरपणात सुरूवातीचे तीन महिने शारीरिक संबंध ठेवू नयेत. 
गर्भवती महिलांमध्ये अचानक होणार्‍या गर्भपाताची कारणे आहेत. साधारणतः प्रत्येक पाच महिलांपैकी एक महिलेचा नैसर्गिक गर्भपात होतो. यात गर्भवती महिलांमध्ये अ‍ॅनिमियाचे वाढते प्रमाण हे प्रमुख कारण. एप्रिल 2018 या महिन्यात राज्यात 3,289 तर मुंबईत 822 अ‍ॅनिमियाग्रस्त महिलांची नोंद झाली आहे.