Tue, Jul 23, 2019 06:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दहावीची नवी पुस्तके यंदा लवकर

दहावीची नवी पुस्तके यंदा लवकर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

दहावीचा अभ्यासक्रम यंदा बदलल्याने नव्यानेच दाखल होणारी ही पुस्तके मंगळवारपासून बालभारतीच्या भांडारात उपलब्ध होणार होणार आहेत. लवकर बाजारात दाखल होणार्‍या या पाठ्यपुस्तकांच्या संच किमतीत 10 ते 12 टक्के वाढ झाली आहे. मराठी माध्यमाचे विज्ञान तंत्रज्ञान या विषयाचे एक पुस्तक 91 रुपयांना मिळत होते, आता दोन पुस्तकांना 140 रुपये मोजावे लागणार आहे. भाषा विषयांच्या पुस्तकांच्या किमतीतही दहा ते पंधरा रुपयांची वाढ झाली आहे.

ही नवीन पुस्तके 3 एप्रिलपासून विक्रीसाठी उपलब्ध होतील, असे बालभारतीने स्पष्ट केले आहे. गेल्यावर्षी नववीची नवी पुस्तके बाजारात यायला जून आणि जुलै उजाडला होता. त्यामुळे यंदा दहावीची तरी पुस्तके लवकर येतील का याबाबत पालकांत चिंता व्यक्‍त केली जात होती. यावर्षी मात्र सर्व पुस्तके भांडारात पोहोचली असल्याची माहिती बालभारतीकडून देण्यात आली.

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार दहावीच्या अभ्यासक्रमात 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून बदल झाला आहे. मराठी माध्यमाचा पुस्तकांचा संच खरेदी करण्यासाठी जवळपास सहाशे रुपये लागणार आहेत, हा संच पूर्वी 540 रुपयांपर्यंत मिळत होता. त्यामुळे नव्याने दाखल झालेल्या पाठ्यपुस्तकांच्या किमती 10 ते 15 टक्क्यांनी वाढल्या आहेत. पुस्तकांचा वाढलेला आकार, पुस्तक छपाईसाठी वापरलेले चार कलर, कागदाच्या वाढलेल्या किमती, ट्रान्स्पोर्ट यामुळे हे दर वाढल्याचे बालभारतीने स्पष्ट केले असले वाढलेल्या किमतीमुळे पालकांच्या खिशाला मोठा भार पडणार आहे. कागद, तसेच त्यावर लागणारे कर, छपाई आणि वाहतूक आदींचेही दर भडकले आहेत. त्यामुळे बालभारतीलाही नवी पुस्तके कमी किमतीत देता येत नाहीत. 

पुस्तकांचा एकदा दर ठरवला की नंतर तो वर्षानुवर्षे तसाच राहतो तो वारंवार बदलला जात नाही. त्यामुळे नवीन पुस्तकांचा दर सध्याच्या दराप्रमाणे वाढवावा लागतो. अभ्यासक्रमांची पुनर्रचना करताना त्यांच्या पुस्तकांच्या किमती  परवडतील अशा स्वरूपात असाव्यात, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.


  •