Mon, May 27, 2019 08:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आमदार प्रशांत ठाकूर यांनी पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नावेळी हा मुद्दा उपस्थित केला.

रायगड जिल्ह्यातील १०३ गावांना दरडी कोसळण्याचा धोका

Published On: Jul 11 2018 6:57PM | Last Updated: Jul 11 2018 6:57PMनवी मुंबई : प्रतिनिधी 

भूवैज्ञानिक आणि भूगर्भ शास्त्रज्ञानी केलेल्या सर्वेक्षणात रायगड जिल्ह्यातील १०३ गावांना धोका असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यामध्ये महाडमधील ४९ गावे, पोलादपूर १५, रोहा तालुक्यातील १३, म्हसळा तालुक्यातील ६, माणगावमधील ५, पनवेल, कर्जत, खालापूर, व सुधागड तालुक्यातील प्रत्येकी ३, श्रीवर्धनमधील २ तर तळा तालुक्यातील एका गावाचा समावेश आहे.तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यामधील १२ गावांतील अनेक वाड्यांना दरडी कोसळण्याचा धोका असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंबंधी सरकारने कोणती उपाययोजना केली यासंबंधी हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नाच्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. 

या प्रश्नावर मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने रायगड जिल्ह्यातील गावांची भूवैज्ञानिक मानकांच्या आधारे दरड कोसळण्याच्या प्रवणतेनुसार वर्ग १, २ व ३ अशी वर्गवारी केली आहे. त्यानुसार महाड तालुक्यातील वर्ग १ मध्ये लोअर तुडील, टोळ खुर्द बौद्धवाडी, मोरेवाडी शिंगरकोंड, पातेरेवाडी आंबिवली बुद्रुक आणि कोंडिवले हि पाच गावे अतिउच्च संभाव्य दरड प्रवण असल्याचा अहवाल देण्यात आलेला आहे. या गावांची अतिउच्च वर्गवारीतील संभाव्य दरडप्रवणता विचारात घेता, पावसाळ्याच्या कालावधीत जागरूक राहण्याचा सल्ला अहवालात देण्यात आलेला आहे. त्यामुळे अतिवृष्टी होत असल्यास नागरिकांना वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना जिल्हास्तरावर देण्यात येत असून त्यांच्या निवासाकरिता पर्यायी व्यवस्था तयार ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अरचनात्मक उपाययोजना राबविण्यास शिफारस केली असल्याचे मंत्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

चिपळूण तालुक्यातील संभाव्य दरडग्रस्त काही गावाचे पुनर्वसन करण्याचे काम चालू आहे. उर्वरित गावातील वाड्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पाहणी करण्यात आले असून त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्यास कळविण्यात आले आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने त्यांच्या अहवालात रायगड जिल्ह्यातील २० गावे (वर्ग १ ची ९, वर्ग २ ची ११) अतिउच्च संभाव्य दरडप्रवण व इतर ८३ गावांमधील दरडप्रवणतेविरुद्ध कार्यवाहीसंदर्भात अरचनात्मक व रचनात्मक उपाययोजना करण्याची शिफारस केलेली आहे.