Sat, Jul 20, 2019 11:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मागासवर्गीयांना शेतजमीन खरेदीसाठी शंभर टक्के अनुदान

मागासवर्गीयांना शेतजमीन खरेदीसाठी शंभर टक्के अनुदान

Published On: May 30 2018 2:14AM | Last Updated: May 30 2018 1:58AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याचा एक भाग म्हणून त्यांना चार एकर कोरडवाहू जमीन खरेदीसाठी 20 लाख तर दोन एकर बागायती शेतीसाठी 16 लाख रूपये अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेच्या माध्यमातून हा निधी देण्यात येईल.

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले म्हणाले, राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांपैकी 95 टक्के लोक भूमिहीन तर उर्वरीत अल्पभूधारक आहेत. त्यांना शेतीच्या रोजंदारीवरच अवलंबून रहावे लागते. शेतीची कामे काही महिनेच उपलब्ध असल्यामुळे या घटकांच्या मूलभूत प्राथमिक गरजाही पूर्ण करण्यात अडचणी येतात. त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना राबवण्यात येते. 

या योजनेंतर्गत या घटकांना शेतजमीन खरेदी करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 50 टक्के अनुदान तर 50 टक्के कर्ज देण्याची योजना होती. मात्र इतक्या कमी किमतीने शेत जमीन नसल्यामुळे या योजनेला अल्प प्रतिसाद मिळत होता.  नवीन निर्णयाप्रमाणे चार एकर कोरडवाहू जमिनीसाठी प्रति एकर पाच लाख रूपयांप्रमाणे 20 लाख रूपये तर बागायती शेतीसाठी 8 लाख रूपये प्रति एकरप्रमाणे दोन एकरसाठी 16 लाख रूपयांचे अनुदान मिळेल.