Sat, Feb 23, 2019 10:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उबर टॅक्सी भाड्यात 10 टक्के कपात !

उबर टॅक्सी भाड्यात 10 टक्के कपात !

Published On: Sep 05 2018 7:44AM | Last Updated: Sep 05 2018 2:44AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबईतील प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी उबरने आपल्या भाड्यात 10 टक्के कपात केली आहे. त्यामुळे उबरचा वातानुकूलित प्रवास सोमवारपासून स्वस्त झाला आहे. प्रवाशांबरोबरच उबरचे भागीदार असलेल्या चालकांनाही याचा फायदा होईल असा दावा कंपनीने केला आहे.

कुलाबा ते वरळी अशा प्रवासाला याआधी 187 रुपये लागत होते ते आता 164 रुपये होतील. पवई ते दादर जे भाडे आधी 285 रुपये होते ते 245वर येईल. त्याचबरोबर बीकेसीपासून विमानतळापर्यंतच्या प्रवासाला 135 रुपये द्यावे लागत होते ते आता 121 रुपये होतील. 

ओला आणि उबर या दोन्ही कंपन्यांनी आपल्या चालकांना जास्त पैसे मिळावेत यासाठी काही योजना सुरू केल्या आहेत. 48 तासांत ठरावीक फेर्‍या झाल्यास त्या चालकाला जवळपास 2 हजार रुपये बोनस मिळतो. अधिकाधिक प्रवासी या कंपन्यांशी जोडले गेले तर हा बोनस वाढू शकतो. 

एखाद्या प्रवाशाने सलग पाच वेळा ओला टॅक्सीचा वापर केला तर त्याला पुढच्या आठवड्यात होणार्‍या दोन फेर्‍यांना 50 रुपयांची सवलत देण्यात येणार आहे. टॅक्सीबरोबरच ओलाच्या रिक्षाही लोकप्रिय होत असल्याचे चित्र आहे. सध्या या कंपनीच्या 30 हजार रिक्षा रस्त्यावर धावत आहेत आणि हा आकडा वाढतच आहे. घाईगर्दीच्या वेळेप्रसंगी नियमित मार्गावर भाडे स्वीकारणे आणि इतर वेळी बुकिंगनुसार भाडे घेणे या कारणामुळे आमचे उत्पन्न वाढत असल्याचे मुलुंड येथील एका चालकाने सांगितले. 

‘दर बदलू’ उबर

मुंबईत प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यात येणार्‍या काळी-पिली टॅक्सीचे दरपत्रक निश्‍चित असते. काली-पिली टॅक्सीने एक किलोमीटरचा प्रवास केल्यास साधारणपणे 22 रुपये इतके भाडे निश्‍चित आहे. मात्र ओला किंवा उबेर या अ‍ॅपबेस टॅक्सी सेवांनी प्रवास केल्यास प्रत्येक वेळीस किलोमीटरसाठी दर मात्र निश्‍चित ठरलेले नाहीत. या सेवांचा वापर केल्यास प्रत्येकवेळी वेगवेगळ्या ठिकाणी दरही वेगवेगळे आकारण्यात येत असतात. गाड्यांची उपलब्धता आणि प्रवाशांकडून असणारी मागणी यावर हे दर बदलत असतात.