Sat, Apr 20, 2019 09:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बिल्डरकडे 10 कोटींची खंडणी मागणार्‍या इस्टेट एजंटला अटक 

बिल्डरकडे 10 कोटींची खंडणी मागणार्‍या इस्टेट एजंटला अटक 

Published On: Jul 08 2018 1:44AM | Last Updated: Jul 08 2018 1:00AMमुंबई : प्रतिनिधी

सांताक्रुज परिसरातील एका बिल्डरला खंडणीसाठी धमकाविणार्‍या धर्मेद्र राघू खंडागळे या 52 वर्षांच्या इस्टेट एजंटला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी मिरारोड येथून अटक केली. अटकेनंतर त्याला येथील लोकल कोर्टाने 12 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. डिसेंबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत त्यांना धर्मेद्रने आंतरराष्ट्रीय कॉलवरुन दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकी दिली होती, यावेळी त्याने काही गुंड टोळ्यांचा उल्लेख केला होता, मात्र त्याचा कुठल्याही गुंड टोळीशी संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

तक्रारदार बिल्डर सांताक्रुज परिसरात राहतात. 2010 साली त्यांनी सांताक्रुज परिसरात एक प्रोजेक्ट हाती घेतला होता, याकामी त्याला काही बिल्डरांनी मदत केली होती. त्यांचा हा संयुक्त प्रोजेक्ट होता, मात्र कालातंराने त्यांचा वाद झाला आणि हा प्रोजेक्ट बारगळला  होता. 

मात्र गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात एका अज्ञात व्यक्तीने फोन करून आपण रवी पुजारी बोलत असल्याचे सांगून त्यांच्याकडे त्यांच्या प्रोजेक्टविषयी चर्चा केली. त्यानंतर विरुद्ध पार्टीला दहा कोटी रुपये देऊन हा वाद मिटविण्याचा सल्ला दिला होता. ही रक्कम दिली नाहीतर त्यांना त्यांच्या कुटुंबियांसोबत ठार मारण्याची धमकीही त्याने दिली होती. सुरुवातीला त्यांनी त्याकडे पूर्णणे दुर्लक्ष केले, मात्र रवी पुजारीच्या नावाने त्यांना सतत दोन महिने धमकी येत होती.

या धमकीनंतर त्यांनी वाकोला पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत वाकोला पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी प्रोजेक्टमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकाची जबानी नोंदवून घेतली होती. शुक्रवारी या पथकाने मिरारोड येथून धर्मेद्र खंडागळे याला  ताब्यात घेतले होते.  तो मिरारोड येथे राहत असून तेा इस्टेट एजंट म्हणून काम करीत होता. त्याला या संपूर्ण प्रोजेक्ट माहिती असल्याची बाब उघड होऊन त्यानेच धमकी दिल्याची बाब समोर आली.