Fri, Apr 26, 2019 09:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात १०९२ शाळा अनधिकृत

राज्यात १०९२ शाळा अनधिकृत

Published On: May 09 2018 1:56AM | Last Updated: May 09 2018 1:25AMमुंबई : पवन होन्याळकर 

सरकारची परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरु केलेल्या शाळांची संख्या राज्यभरात वर्षानुवर्षे वाढत आहे. राज्यभरात तब्बल 1 हजार 92 शाळा अनधिकृतपणे पूर्वपरवानगीशिवाय बिनबोभाटपणे सुरु असल्याचे यू-डायस अहवालातूनच उघड झाले आहे. अशा शाळांचे सर्वाधिक प्रमाण मुंबईसह उपनगरांत आहे, मुंबईत तब्बल 222, पालघरला 208 आणि ठाण्यात 185 अनधिकृत शाळा आहेत. या अनधिकृत शाळांत पहिली ते आठवी या वर्गात 1 लाख 34 हजार 662 तर नववी ते बारावीत 8 हजार 128 विद्यार्थी शिकत असल्याची धक्‍कादायक माहिती आहे.

मे महिन्याच्या तोंडावर राज्यातील अनधिकृत शाळांची यादी दरवर्षी जाहीर केली जाते. या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये अशा पालकांना जुजबी सूचना देऊन या शाळांना  नोटीसा काढल्या जातात मात्र कारवाईचा बडगा उगारला जात नसल्याने दरवर्षी अशा शाळांत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.राज्यभरात तब्बल 1 हजार 92 शाळा अनधिकृतपणे पूर्वपरवानगीशिवाय सुरु आहेत. यात 152 मदरशांचा समावेश आहे.  

मुंबई महापालिका क्षेत्राच्या हद्दीत 222 शाळा तर शिक्षण उपसंचालकांच्या अखत्यारितील 18 शाळा शिक्षण विभागाची मान्यता न घेताच अनधिकृतपणे सुरू आहेत. या शाळांना कोणत्याही प्रकारची मान्यता नसून त्या बोगस असल्याचे जाहीर केले असले तरी या शाळांमध्ये मोठया प्रमाणात प्रवेश सुरू असल्याने पालिकेच्या शिक्षण विभागाकडून नोटिसीव्यतिरिक्‍त या शाळांवर कारवाई केलेली नाही. मुंबईत सर्वाधिक अशा 44  शाळा या कुर्ला, मानखुर्द, गोवंडी, शिवाजीनगर, या एम पूर्व  वार्डात चालविल्या जात आहेत. त्या खालोखाल शाळा घाटकोपर एल वार्ड आणि एम पूर्व या वार्डात आहेत.तर सर्वात कमी अनधिकृत शाळा या ए वार्डात आहेत.त्यानंतर विक्रोळी, भांडुप, बोरिवली, दहिसर, जोगेश्वरी, मुलुंड, गोरेगाव, अंधेरी, वडाळा, धारावी,माहीम, रे रोड, माझगाव, नायगाव, दादर, भायखळा या भागातही बोगस शाळा आहेत. 

त्यापाठोपाठ पालघर जिल्ह्यातही शाळांचा सुळसुळाट सुरु आहे. पालघर जिल्ह्यात तब्बल 208 अनधिकृत शाळा सुरु आहेत. ठाण्यात 185 अनधिकृत शाळा सुरु आहेत. त्यापाठोपाठ पुणे 70, रायगडमध्ये 40 अनधिकृत शाळा आहेत. दरम्यान यंदा या शाळांना शिक्षण संचालनालयाने नोटिसा काढल्या आहेत. या अनधिकृत शाळा बंद न केल्यास एक लाख इतका दंड वसूल केला जाणार आहे. त्यातूनही शाळा सुरु ठेवल्यास प्रतिदिन दहा हजाराचा दंड आकारला जाईल, असे आदेश दिल्याने या बोगस शाळांचे धाबे दणाणले आहेत.

Tags : Mumbai, mumbai news, 10 9 2 school,  unauthorized,