Mon, Sep 24, 2018 21:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कळव्यात 1 कोटी 68 लाख 50 हजारांच्या जुन्या नोटा जप्त

कळव्यात 1 कोटी 68 लाख 50 हजारांच्या जुन्या नोटा जप्त

Published On: Jul 04 2018 2:16AM | Last Updated: Jul 04 2018 1:08AMभिवंडी : वार्ताहर

मागील वर्षी बंद झालेल्या जुन्या नोटा बदलवून घेण्यासाठी कळव्यात आलेल्या त्रिकुटाकडून 1 कोटी 68 लाख 50 हजार रुपयांच्या पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटा भिवंडी गुन्हे शाखेने सापळा रचून जप्त केल्या. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्या नोटा कुठून आणल्या आणि त्या कोणाकडून बदलवून घेण्यात येणार होत्या, याचा तपास भिवंडी गुन्हे शाखेने सुरू केला आहे.

कळवा येथे काहीजन जुन्या नोटा बदलवून घेण्यासाठी येणार असल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांना मिळाली. या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक संतोष चौधरी, पोलीस कर्मचारी विकास लोहार, श्रीधर हुंडेकरी, प्रमोद धाडवे यांच्या पथकाने  कळवा येथील पारसिक सर्कल हॉटेल अमित गार्डन येथे पाळत ठेवली.

येथे बसलेले राजन मुत्तुस्वामी तेवर, इम्रान अहमद शेख दोघेही रा. ठाणे व शेखर कैलास जाधव रा. सायन कोळीवाडा, मुंबई यांना संशयावरून ताब्यात घेतले. त्यांच्या कडील बॅगेची झडती घेतली असता, 500 रुपयांच्या जुन्या नोटांचे 337 बंडल, तर हजारच्या 12 नोटा आढळून आल्या.