१,५२६ पोलिसांचा कोरोनाशी लढा सुरुच

Last Updated: Jun 04 2020 1:06AM
Responsive image


मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्यात 1 हजार 526 पोलिसांचा कोरोनाशी लढा सुरु असून मुंबई पोलीस दलातील एका सहायक पोलीस निरीक्षकासह 30 जणांचा मृत्यु झाला आहे. स्वतः जीव धोक्यात घालून कोरोना संबंधी कर्तव्य बाजावत असलेल्या पोलिसांना कोरोनाची लागण होत असून हे प्रमाण दर दिवसाला सरासरी शंभरवर पोहचले आहे. राज्यात तब्बल 2 हजार 500 हून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून राज्यातील विविध रुग्णालयांत 1 हजार 526 पोलिसांवर उपचार सुरु आहेत.

कोरोना बंदोबस्तासह जारी करण्यात आलेले निर्बंध, नियम आणि कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडत असलेल्या पोलिसांवर हल्ल्याच्या घटना घडत असून या हल्ल्यांप्रकरणी 258 गुह्यांची नोंद करण्यात आली आहे. तर, आतापर्यंत 838 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

कुर्ला पोलीस ठाण्यातील 49 वर्षीय अंमलदाराचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 30 पोलिसांना जीव गमवावा लागला आहे. यात मुंबई पोलीस दलातील 20 हून अधिक पोलिसांचा समावेश आहे.

कुर्ला पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हे पोलीस अंमलदार गेल्या वर्षभरापासून कर्करोगाशी लढत होते. कर्करोगावर उपचार सुरु असल्याने ते रजेवर होते. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात कुटुबियांसोबत रहात असलेल्या या अंमलदार यांना 19 मे रोजी कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.