होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत मराठीप्रेमी पालक महासंमेलन

'केमिस्‍ट्रीला चेमिस्‍ट्री म्‍हणलो म्‍हणून काय झाले...'

Published On: Dec 23 2017 4:45PM | Last Updated: Dec 23 2017 4:45PM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

“दहावीपर्यंतचं माझं शालेय शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेत झालं. महाविद्यालयात जेव्हा विज्ञान शाखेला प्रवेश घेतला तेव्हा मी केमिस्ट्रीच्या वर्गाला चेमिस्ट्रीचा वर्ग असं म्हणालो, कारण योग्य उच्चार मला माहितच नव्हता. पण उच्चार चुकला म्हणून माझं काही नुकसान झालं नाही. देशातल्या सर्वोत्कृष्ट गणल्या जाणा-या मुंबईतील युडीसीटी संस्थेतून मी केमिकल इंजिनिअर झालोच,” असे प्रतिपादन पाच हजारांहून अधिक शाळा डिजिटल करणारे धुळ्याचे तरुण शैक्षणिक कार्यकर्ते हर्षल विभांडिक यांनी व्यक्त केले. मराठी अभ्यास केंद्र आणि शिव शिक्षण संस्थेचे डी. एस. हायस्कूल यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलना’चे उदघाटन हर्षल विभांडिक यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

मातृभाषेतून शिकल्याने विद्यार्थ्याची आकलनक्षमता वाढते. बौध्दिक, मानसिक, सांस्कृतिक आणि भाषिक असा सर्वांगीण विकास होतो, हे जगभर मान्य झालेलं आहे. असे असतानाही इंग्रजी ही काळाची गरज आहे म्हणत आणि केवळ प्रतिष्ठेपायी आज मराठी शाळांकडे पालक पाठ फिरवत आहेत. इंग्रजी भाषा ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच शिकता येते या गैरसमजुतीमुळेही अनेक पालक इंग्रजी शाळांकडे वळत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने, अद्ययावत सुविधांनी आणि अधिक गुणवत्तापूर्ण प्रयोगशील शिक्षण पद्धतीने मराठी शाळा परिपूर्ण करणं ही दीर्घ काळ चालणारी प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेत संस्थाचालक, शिक्षक हे नेहमीच मोलाची भूमिका पार पाडत असतात. त्यांच्याचबरोबरीने आता पालकांनीही सक्रीय भूमिका घेणे आवश्यक असल्याचा सूर पहिल्या दिवशी व्यक्त करण्यात आला.

राज्य सरकार आणि महापालिकेच्या मराठी शाळा बंद करण्याच्या हालचाली सध्या वेगाने सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर या संमेलनातून मराठी पालकांचा आवाज बुलंद करण्यासाठी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

मराठी शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षक, पालक, संस्थाचालक, अभ्यासक यांना उपयोगी पडेल असे शिक्षणतज्ज्ञ, लेखिका डॉ. वीणा सानेकर यांनी संपादित केलेले मराठी शाळांवरील ‘आपली भाषा, आपल्या शाळा, आपली मुले’ हे विशेष पुस्तक या संमेलनात प्रकाशन पहिल्या सत्रात करण्यात आले.