होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘अब तक छप्पन’चा सहाय्यक दिग्दर्शक रविशंकर यांची आत्महत्या

‘अब तक छप्पन’च्या सहाय्यक दिग्दर्शकाची आत्महत्या

Published On: Jul 12 2018 10:27AM | Last Updated: Jul 12 2018 10:35AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

हिंदी चित्रपटसृष्टीतील स्क्रिप्ट राईटर रविशंकर आलोक (वय-32) यांनी बुधवारी इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली. ‘अब तक छप्पन’ या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शन त्यांनी केले होते. 

वर्सोवा येथील सात बंगला परिसरात असलेल्या वसंत अपार्टमेंटच्या छतावरून उडी घेत आलोक यांनी आत्महत्या केली. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. आलोक यांच्याकडून कोणतीही चिठ्ठी सापडली नाही. पण गेल्या वर्षभरापासून त्यांच्याकडे काम नव्हते त्यातून आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेल्या 'अब तक छप्पन' या चित्रपटाचे दिग्दर्शक शिमित अमीनसोबत आलोक यांनी काम केले होते. 

आलोक त्यांच्या भावासोबत भाड्याच्या घरात राहत होते. बुधवारी दुपारी सात मजल्याच्या इमारतीच्या छतावरून त्यांनी उडी मारली. गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात असलेल्या आलोक हे डॉ.पाटकर यांच्याकडे उपचार घेत होते. यासंदर्भात पोलिस अधिक तपास करत असून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कपूर रुग्णालयात नेण्यात आला आहे.