होमपेज › Marathwada › पत्रकारांवरील खोटे गुन्हे मागे घेणार 

पत्रकारांवरील खोटे गुन्हे मागे घेणार 

Published On: Mar 25 2018 1:50AM | Last Updated: Mar 25 2018 1:25AMपरभणी : प्रतिनिधी

जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेतील पेपरफुटीची बातमी प्रसिद्ध केल्याप्रकरणी 2 दैनिकांच्या पत्रकारांवर शिक्षण विभागाने दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचा ठराव, 23 मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. 

अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा उज्ज्वला राठोड होत्या. यावेळी उपाध्यक्षा भावना नखाते, सीईओ बी.पी.पृथ्वीराज, अतिरिक्‍त सीईओ प्रताप सवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम.व्ही.करडखेलकर, साहेबराव देसाई, विजय मुळीक, सभापती अशोक काकडे, श्रीनिवास जोगदंड, ऊर्मिलाताई बनसोडे, राधाबाई सूर्यवंशी आदी उपस्थित होते. सभा सुरू झाल्यानंतर काँगे्रसेचे गटनेते श्रीनिवास जोगदंड यांनी विज्ञान विषयाच्या पेपर फुटीची बातमी छापणार्‍या दोन पत्रकारांवर शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. हा लोकशाहीची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न असल्याचेही ते यावेळी म्हणाले. ही बाब चुकीची आहे. त्यामुळे पत्रकारांवरील खोटे गुन्हे त्वरित मागे घेण्याचा ठराव मांडला. त्याला डॉ.सुभाष कदम  यांनी अनुमोदन दिले. यावेळी सर्व बाबींची शहानिशा करून वृत्त प्रसिध्द केल्यानंतरही ती बातमी चुकीची असल्याचा आव अधिकारी आणत असल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. या प्रकरणास शिवेसनेचे सदस्य विष्णू मांडे यांनी दुजोरा दिला. त्यानंतर हा ठराव सभागृहात सर्वानुमते मंजूर करण्यात आला.  या ठरावानंतर सीईओ पृथ्वीराज यांनी सकारात्मक भूमिका घेतली. यात ते म्हणाले की, हा विषय खर्‍या अर्थाने वाढविण्याची गरज नव्हती. पण आता या प्रकरणात दोषी नसणार्‍या कोणावरही अन्याय होवू दिला जाणार नाही. यात पत्रकारांवर जो काही गुन्हा दाखल झाला आहे. त्याबाबत विचार केला जाणार असून या पत्रकारांना सदरील प्रकरणात आरोपी केले जाणार नाही. तर त्यांना साक्षीदार म्हणून यात मदत घेतली जाणार असून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. यावेळी अजय चौधरी, समशेर वरपुडकर, राम पाटील, नमिताताई बुधवंत आदी उपस्थित होते.