Mon, Jul 15, 2019 23:39होमपेज › Marathwada › बीड तालुक्यातील तरुणास जिवंत जाळले

बीड तालुक्यातील तरुणास जिवंत जाळले

Published On: Jan 08 2018 4:23PM | Last Updated: Jan 08 2018 5:03PM

बुकमार्क करा
वडीगोद्री : प्रतिनिधी 

पैशांच्या आर्थिक देवाण-घेवाणीतून मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. तरुणाचे हात-पाय तारेने बांधून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. औरंगाबाद-बीड राष्ट्रीय महामार्गालगतच्या पाथरवाला-गोंदी रस्त्यावर कुरण फाटा येथे हा खळबळजनक प्रकार घडला. तरुणाचा खून करून जाळले की, जिवंत पेटवून मारले, हे स्पष्ट होऊ शकले नाही. अनंत श्रीकांत इंगोले (वय 27, रा. समनापूर, जि. बीड) असे मृताचे नाव आहे.

अनंत इंगोले बीड बसस्थानकामागे इंटरनेट  कॅफे चालवत होता. जोडव्यवसाय म्हणून त्याने नातेवाइकांकडून काही पैसे घेऊन ट्रक विकत घेतला होता. तो मुंबई येथील कंपनीत लावला. परंतु, कंपनी बंद पडल्याने त्याने ट्र्क विक्री केला. त्याचा जवळचा मित्र तुकाराम घोलप बीडच्या पंचायत समितीमध्ये ग्रामसेवक आहे.   अनंतने शुक्रवारी (दि. 5) दूरध्वनी करून सांगितले की, मी ट्रक विकला असून, त्याचे 21 लाख रुपये मिळाले आहेत. या पैशांतून नातेवाइकाचे पैसे देण्याकरिता रविवारी सायंकाळी बीड येथे येत असून, माझ्याजवळ पैसे असून, सोबत मित्र धुमाळ आहे. दोघे मिळून हिशेब करून सगळ्यांचे पैसे देणार आहोत.

पुन्हा दि. 7 जानेवारी रोजी अनंतने घोलप यास फोन केला की, मी साथीदार धुमाळ व इतरांसोबत चारचाकीने बीडला निघालो आहे. सायंकाळ उलटल्यानंतरही अनंत बीडला आला नाही. मित्र तुकाराम घोलप याने अनंतला रात्री 9.30 वाजता फोन केला असता अनंत म्हणाला की, पाचोडजवळ एका धाब्यावर जेवणासाठी थांबलो आहे. रात्री 12 वाजता अनंतने त्याचा मित्र घोलप याला पुन्हा फोन केला की, माझा घातपात होण्याची शक्यता असून, माझा साथीदार धुमाळ, त्याच्या सोबतचे मित्र यांचे काही लक्षणे ठीक नाही, मला भीती वाटत असून, मी लघवीच्या बहाण्याने येऊन फोन केला आहे. ते पुन्हा माझ्याकडे येत असून, मी नंतर फोन करतो, असे म्हणून त्याने फोन कट केला. दरम्यान, रविवारी रात्री दोन वाजता समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या सुरक्षा रक्षकाने शहागड -गोंदी रस्त्यावर कुरण फाट्याजवळ तरुणाचा मृतदेह जळत असल्याची माहिती गोंदी पोलिसांना कळवली. पोलिसांनी अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह विझविला. 

मोठ्या भावाला ‘एसएमएस’

रात्री 12.30 वाजता तुकाराम घोलपने अनंतला फोन केला, तेव्हा अनंत याने, आम्ही जेवण करून बीडकडे निघालो आहे, असे घाबरलेल्या अवस्थेत सांगितले. त्यानंतर अनंत याने त्याचा मोठा भाऊ गोविंद  इंगोले याच्या मोबाईलवर मेसेज केला. मी धुमाळसोबत असून, त्याच्याकडून मला 21 लाख रुपये येणार आहेत. त्याचे लक्षण बरोबर नाही.