Fri, Jul 19, 2019 00:54होमपेज › Marathwada › खड्ड्यात दुचाकी कोसळून युवक ठार

खड्ड्यात दुचाकी कोसळून युवक ठार

Published On: Mar 22 2018 1:42AM | Last Updated: Mar 22 2018 12:26AMअंबासाखर : प्रतिनिधी 

लातूर-अंबाजोगाई रोडवरील वाघाळा पाटीजवळ काम सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामातील खड्ड्यात मोटारसायकल कोसळून एक महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी रात्री झाला.

अकरावीची परीक्षा देऊन बारावीच्या वर्गात गेलेले पवन मुंजाजी कनले (वय 17, रा. जैन गल्ली, अंबाजोगाई) आणि ऋषिकेश लक्ष्मण गडदे (वय 17, रा. बोधेगाव, ता. अंबाजोगाई) हे दोन विद्यार्थी रात्री उशीरापर्यंत शहरातील एका अभ्यासिकेत बसून होते. मंगळवारी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास ते तिथून निघून गेले. त्यांची पल्सर मोटारसायकल वाघाळा जवळ सध्या काम सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाच्या जागेत कोसळली. या अपघातात पवन कनले याचा जागीच मृत्यू झाला तर ऋषिकेश गडदे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
पहाटेच्या सुमारास रस्त्याने जाणार्‍या काही जागरूक नागरिकांना युवक बांधकामाच्या जागेत पडल्याचे दिसले. त्यांनी 108 रुग्णवाहिकेला बोलावून घेऊन जखमी ऋषिकेशला रुग्णालयात हलविले. 

दरम्यान, हे दोन्ही विद्यार्थी अंबाजोगाई-लातूर रोडवर कशासाठी गेले होते याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.