Sun, Sep 23, 2018 14:21होमपेज › Marathwada › घरासाठी उपोषण करताना महिलेची प्रसुती

घरासाठी उपोषण करताना महिलेची प्रसुती

Published On: Mar 19 2018 3:17PM | Last Updated: Mar 19 2018 4:54PMबीड : प्रतिनिधी

घरकूलच्या मागणीसाठी सहा दिवसांपासून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या पारधी समाजातील महिलेची उपोषणादरम्‍यानच प्रसूती झाली. महिला व बालकांच्या आरोग्यासाठी प्रशासन सजग आणि जागृत असल्याच्या जाहिराती सगळीकडे झळकत असताना ही घटना घडल्‍याने खरे वास्‍तव समोर आले आहे.  

शहराजवळील वासनवाडी येथे राहाणारे पारधी समाजातील सुरेखा शहाजी पवार ही महिला तिच्या संपूर्ण कुटुंबासह मागील सहा दिवसांपासून जिल्हधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसली आहे. नऊ महिन्यांची गरोदर असताना ती या आंदोलनात सहभागी झाली होती. सोमवारी पहाटे या महिलेची जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषणासाठी उभारलेल्या ओट्यावरच प्रसुती झाली.

विशेष बाब म्हणजे गेल्या सहा दिवसांपासून हे कुटुंब उपोषणास बसलेले असताना त्यांच्याकडे एकही अधिकारी फिरकला नाही. घरासाठी आंदोलन करत असताना प्रसुती झाल्‍याने या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. तर, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर समाजातून ताशेरे ओढण्यात येत आहेत.