परळी : दागिने चोरीच्या आरोपाने महिलेची आत्‍महत्‍या

Last Updated: Nov 11 2019 1:33AM
Responsive image


परळी : प्रतिनिधी 

धुणीभांडी करून घर चालवणार्‍या एका महिलेवर दागिने चोरीचा आरोप करण्यात आला. या प्रकरणात चौकशीसाठी पोलिस घरी येवून गेल्याने घाबरलेल्या कामगार महिलेने विषारी द्रव्य प्राशन केले. उपचारादरम्यान तिचा अंबाजोगाईच्या सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला.

या घटनेनंतर मृत महिलेच्या संतप्त नातेवाईकांनी दागिने चोरीचा आरोप करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. नातेवाईकांनी आत्महत्या केलेल्या महिलेचा मृतदेह परळी शहर पोलिस ठाण्यासमोर जीपमध्ये आणून ठेवला. यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी महिलेस चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर हा तणाव निवळला.

छबूबाई नारायण पाचमासे (वय 55) असे विष प्राशन केलेल्‍या महिलेचे नाव आहे. त्‍या परळीतील स्नेहनगर येथे राहत होत्‍या. ही महिला परळीत धुणीभांडी करुन घर चालवायची. छबूबाई धुणीभांडी करून घराचा उदरनिर्वाह करत होत्या. मागील काही दिवसापूर्वी त्‍या धुणीभांडी करणार्‍या घरातील एका महिलेने आपल्या घरातील दागिने छबूबाईने चोरुन नेले असल्‍याचा आरोप करत शहर ठाण्यात याबाबत एक तक्रार अर्ज दिला.

हा अर्ज मिळाल्यानंतर पोलिस चौकशीसाठी छबूबाईच्या घरी गेले. त्यानंतर 7 नोव्हेंबरच्या रात्री भितीपोटी छबूबाईने विषारी औषध प्राशन केले. नातेवाईकांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीन तिला उपचारासाठी परळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अस्वस्थ बनल्याने पुढील उपचारासाठी अंबाजोगाईच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 

त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी त्‍यांचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. मात्र, नातेवाईकांनी रुग्णवाहिका जीप थेट परळी शहर ठाण्यासमोर आणून उभा केली. दागिने चोरीचा आरोप करणार्‍या महिलेवर छबूबाईच्या मृत्यूस कारणीभूत ठरवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा. तरच मृतदेह ताब्यात घेवू अशी मागणी करत नातेवाईकांचा जमाव ठाण्यासमोर जमा झाला. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मंजुबाई गणेश पुजारी यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक भारती जाधव या करत आहेत.