Thu, Apr 25, 2019 15:26होमपेज › Marathwada › पंकजा मुंडेंविरोधात सेनेचा उमेदवार कोण?

पंकजा मुंडेंविरोधात सेनेचा उमेदवार कोण?

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 23 2018 11:35PMबीड : उत्तम हजारे

मातोश्रीच्या आदेशानुसार परळीत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची घोषणा शिवसेनेने केली असली तरी परळीत मुंडेंच्या विरोधात मैदानात उतरणार कोण, असा प्रश्‍न शिवसैनिकांसमोर पडला आहे. मागील विधानसभा निवडणूकीत शिवसेनेेन जिल्ह्यात सर्वत्र उमेदवार उभा केले होते, मात्र परळीत पंकजा मुंडे यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. मुंडे घराणे आणि मातोश्रीचे नेहमी सख्य राहिले आहे. मात्र आताच पंकजा मुंडे यांना घेरण्याची तयारी शिवसेनेने कशासाठी चालविली आहे, असाही प्रश्‍न चर्चीला जात आहे.

परळी विधानसभेसाठी मुंडे बहिण भावाची जोरदार तयारी सुरु केली आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील लढत लक्षवेधी ठरणार आहे. या लढतीत शिवसेनेने उडी घेण्याचे जाहीर करुन परळीतील निवडणूक राजकीयदृष्ट्या किती महत्तवची असेल, त्याचे संकेत दिले आहेत. शिवसेना पक्षनेतृत्वाने कुंडलिक खांडे, सचिन मुळूक या दोन उमद्या तरुणांकडे जिल्ह्याची धुरा दिली आहे. जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी पहिल्या दिवसापासून पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात भूमिका घेत शिवसेनेची बांधणी चालवली आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनी तर यापूर्वी झालेल्या बीडमधील बैठकीत पंकजा मुंडे यांच्या विरोधात काम करण्याचा शिवमंत्र शिवसैनिकांना दिला होता. सध्या जिल्ह्यात शिवसेनेचे शिवसंपर्क मेळावे होत आहेत.

परळीत झालेल्या मेळाव्यात आ.सुभाष साबणे यांनी आपण मातोश्रीचा निरोप घेऊन आलो असल्याचे सांगत परळीत शिवसेना पंकजा मुंडे यांच्या विरोधात सर्व ताकदीनिशी लढणार असल्याचे जाहीर केल्याने परळीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. परळीवर गोपीनाथ मुंडे यांचे वर्चस्व राहिलेले आहे. शिवसेनेनेही त्यांना खंबीरपणे साथ दिलेली आहे. परळीतील शिवसेना नेत्यांना कामाला लावण्याची किमया मुंडे यांच्याकडे होती. मातोश्रीवरुन निघालेला आदेश परत घ्यावयास लावण्याची ताकद मुंडे यांच्यात होती. मुंडे यांच्या निधनानंतरही पंकजा मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी स्नेह कायम ठेवला आहे. हा स्नेह पंकजा मुंडे यांच्या कितपत कामी येईल हे लवकरच दिसून येईल.

सेनेचे धनंजय मुंडेंकडे दुर्लक्ष
पालकमंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे अशी लढत विधानसभेला अपेक्षित आहे. परंतु सेनेकडून मात्र धनंजय मुंडेंचा साधा उल्लेखही केला जात नसून पंकजा मुंडे यांच्याच विरोधात उमेदवार देण्याचा डांगोरा पिटला जात असल्याने सेनेकडून धनंजय मुंडेंकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

सोळंके, ठक्कर चर्चेत
मातोश्रीचा आदेश आला तर परळीत शिवसेनेचा उमेदवार कोण असेल, पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंच्या विरोधात लढणार कोण असा प्रश्‍न शिवसैनिकांना पडला आहे. शिवसेनेकडून तालुकाप्रमुख वैजनाथ सोेळंके, अभयकुमार ठक्कर, देविप्रसाद पांडे, भोजराज पालीवाल यांची नावे चर्चेत आहेत. अंबाजोगाईचे शिवाजी कुलकर्णी हेही परळीतील उमेदवार असू शकतात. किंवा इतर पक्षातून ऐनवेळी आयात करुन एखाद्या तगड्या नेत्यास शिवसेनेची उमेदवारी दिली जाऊ शकते.

शिवसेनेचे दबावतंत्र
पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी शिवसेनेचे हे आव्हान स्विकारले आहे. परळीतील धनंजय मुंडे यांचे महत्त्व कमी करण्यासाठी खेळलेली ही खेळी असावी अशीही चर्चा आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे हे दबावतंत्र असून युती झाल्यास परळीच्या बदल्यात जिल्ह्यात आणखी एखादी जास्त जागा स्वतःकडे घेता येईल असा सेना नेत्यांचा कयास असावा. भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी बीड जिल्ह्यात एकएक करुन शिवसेनेच्या दोन जागा भाजपाकडे घेत केवळ बीडची जागा शिवसेनेकडे ठेवली होती.