Tue, Sep 25, 2018 02:46



होमपेज › Marathwada › सत्काराला फाटा देत बी-बियाणांचे वाटप

सत्काराला फाटा देत बी-बियाणांचे वाटप

Published On: May 04 2018 1:52AM | Last Updated: May 04 2018 12:34AM



आष्टी : सचिन रानडे 

लग्नसोहळा म्हटलं की बँड बाजा, वरात, आलेल्या मान्यवरांचा सत्कार, त्यांचा पाहुणचार या सर्वच गोष्टीला फाटा देत साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पाडत सामाजिक जाणिवेतून शहरातील मंडले कुटुंबीयांनी तालुक्यातील काही गरजू अल्प भूधारक शेतकर्‍यांना बी-बियाणांचे वाटप केले. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.

सध्या सर्वत्र लग्नसराईची धामधूम सुरू आहे. वधू-वरांकडून लग्नसोहळा देखणा व्हावा, थाटामाटात व्हावा. यासाठी नवनवीन प्रयोग निर्माण केले जातात .त्यामुळे अशा सोहळ्यांवर अमाप खर्चाची उधळपट्टी केली जाते.त्यातच या सोहळ्यासाठी येणार्‍या मान्यवरांच्या फेटे, शाली, हार-तुरे यावरही हजारोंची उधळण केली जाते. मात्र यातूनही सोहळा संपन्न होताच हे फेटे कार्यालयात तसेच राहतात तर हार-तुरे सुकून जातात. मग अशा सोहळ्याचा आणि सत्काराचा फायदा काय? म्हणूनच या सर्वच प्रकाराला कात्री लावत आष्टी शहरातील व्यापारी बलराम मंडले यांनी मुलगा सत्यजीत आणि पुणे येथील पूजा अहीर यांच्या विवाह प्रसंगी तालुक्यातील काही गरजू अल्प भूधारक शेतकर्‍यांना बी-बियाणांचे वाटप करून आगळा वेगळा लग्नसोहळा पार पाडला. सामाजिक बांधिलकीतून समाजाप्रती आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने त्यांनी उचललेले पाऊल निश्‍चित कौतुकास्पद आहे. त्यामुळेच शहरात या वेगळ्या थाटणीच्या लग्नाची चर्चा दिवसभर ऐकायला मिळाली.