Thu, Apr 25, 2019 13:24होमपेज › Marathwada › भर पावसाळ्यात पाण्यासाठी ग्रामस्थ रस्त्यावर

भर पावसाळ्यात पाण्यासाठी ग्रामस्थ रस्त्यावर

Published On: Aug 06 2018 1:52AM | Last Updated: Aug 06 2018 12:15AMवडवणी : प्रतिनिधी 

पावसाळा सुरू असूनही तालुक्यातील पिंपरखेड येथील  ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्याविना हाल होत असल्याने ग्रामस्थांनी सरपंच, उपसरपंच, पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष, सचिव यांच्या घरावर हलगी वाजवित हंडा मोर्चा काढला. 

पिंपरखेड येथील ग्रामपंचायत मार्फत गावात राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत गावात पाइपलाइन करण्यात आली आहे, मात्र गावातील साठे नगर मधील दलितवस्तीत पाईपलाईन करण्यात आली नाही. वेळोवेळी मागणी करूनही ग्रामपंचायत अथवा पाणीपुरवठा समितीकडून दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त झालेल्या साठे नगरमधील नागरिकांनी रविवारी सकाळी आठ वाजता हलगी वाजवित हंडा मोर्चा काढला. महिलांनी सोबत हंडे घेऊन घोषणाबाजी करीत सुरुवातीला उपसरपंच दिगंबर जोशी यांच्या घरावर मोर्चा नेला. त्यानंतर सरपंच सविता खळगे यांच्या घरी मोर्चा गेला. तिथून पाणीपुरवठा समितीचे सचिव भागवत निपटे व अधक्ष कुशावर्ता गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला. 

मोर्चेकरी महिलांनी पाण्याच्या टाकीखाली ठिय्या आंदोलन सुरू केले. गावचे माजी सरपंच अशोक निपटे यांनी आंदोलकत्यार्ंसोबत चर्चा करून  तत्काळ पाइपलाइन करण्यात येईल असे आश्‍वासन दिल्यावर टाळ्या वाजवित महिलांनी आंदोलन मागे घेतले.